Type Here to Get Search Results !

आठवणीतील कोजागिरी...

आठवणीतील कोजागिरी...कठिण पुलावरील माळावर फुलायची शुभ्र मोत्यांची शेती....!


   आभाळात पडलेले टपोर चांदणे...निसर्गाने फुलवली मोत्यांची शेती...अंगाला झोंबणारा गार वारा..अनं ..कठीणपुलावर भरणारा नवोदित कवींचा मेळा....गप्पा ..गोष्टी...त्यांनतर...भेळ....मसाले दुध...माळशिखारे साहेब यांच्या संघटन कौशल्याने शेकडो तरुण ...कोर्हाळे च्या माळावर जमत कोजागिरी पोर्णिमा साजरी करत होतो.
सोमेश्वरनगरचा ग्रामिण कवी सोमनाथ यांच्या " दारात फटफटी...घरात कटकटी..." या कवितेने कोजागिरीची सुरुवात होत होती. हा देश माझा...या गाण्याने मी त्यात रंग भरायचो...त्यानंतर खुमासदार किस्से...गोष्टी रंगत जायाच्या...आभाळात पोर्णिमेचा चंद्र काही वेळ या कवी संमेलनात रमायचा...संतोष शेंडकर सुत्रसंचालन करत...विनोदाची पेरणी करायचे...पानसरे सर, माळशिखारे साहेब...अशी दाद द्यायचे कि....समोरचा माणूस हरखुन जायाचा...!
या माळावर मला अनेक मित्र मिळाले जिवाभावाचे...मनापासून प्रेम करणारे,...विचारांची ही नाळ जुळलेले....!
आज वाट्सअँप , फेसबूक च्या जमान्यात अनेक ग्रुप आहेत...अनेक मित्र आहेत पण माळावर जमलेला आमचा ग्रुप आजही मनाने तेवढाच घट्ट आहे.
आज ग्रुपवर आमच्या जाती ची शक्ती दाखवाणारे हजारो फोटो पडतात..पण माळावर जमलेल्या माणसांच्या ग्रुपने कधी जातीपातीचा विचार केला नाही. जे सर्वांग सुंदर ते माझे ..जो माणूस माणसावर प्रेम करतो असा मानवतेचा ग्रुप सोशल मिडीयातून निर्माण होतील का ?
कधी कधी भारत माझा देश आहे...आणि फक्त माझ्या जातीचा माणूस माझा बांधव आहे....अशी संस्कृती निर्माण होऊ नये ...एवढीच माफक अपेक्षा.
कोजागिरी ला पांढरेशुभ्र चांदणे पडते. आभाळ लख्ख मोत्यांसारख्या चांदण्यांनी भरुन जाते...सुर्यास्तानंतर रात्रीच्या गर्भात काळा अंधार दाटून येत असताना..अश्विनातील कोजागिरी ...शरदांचे चांदणे त्याच्या कुवतीप्रमाणे..अंधाराला..संपवण्यासाठी...पुढे येते. अंधाराला दूर करत शुभ्र प्रकाश पाडते.
आजूबाजूच्या नकारात्मक काळोखाला न घाबरता ..कठिणपुलावर जमणार्या तरुणांनी ठरवले तर लख्ख चांदणे पाडता येईल...मोत्यांची उधळण करता येइल..!
माझ्या सारख्या अनेक तरुणांना मागल्या दहा बारा वर्षापुर्वीचा हा सोहळा आजही आंनदाची आठवण देऊन जातो...अनेकदा झाले गेले विसरुन जावे ...असे म्हणतात पण जिवनातील काही क्षण मनात जगण्याची उमेद देतात...त्यातीलच हि एक भुतकाळातील आठवण..!
कोजागिरी पोर्णिमेला अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने ही पोर्णिमा साजरी केली जाते पण आजही मनाच्या हळव्या कोपर्यात माळावरची कोजागिरी घर करुन आहे.
पुन्हा एकदा...जमू कधी तरी कठिणपुलावरील माळावर....!

- बिपीन जगताप
Tags

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.