मी दहावीत असताना घडलेली एक विनोदी प्रसंग आठवला कि आम्हाला आजही हसू येते.....प्रसंगच तसा आहे मजेदार पण अंगावर शहारे उभा करणारा....!
आमच्या गावात मराठी सातवी पर्यंत शाळा होती. आठवीत प्रवेश घेण्यासाठी शेजारच्याच पाच किलोमीटर लांब असणाऱ्या गावातील शाळेत गेलो.
माझ्या बरोबर सातवीत शिकणारी विकास,पंकज,बापू शिंदे , संभाजी, महादेव महेंद्र विनोद, भरत,शत्रुग्न, अशी आठ दहा पोरांनी शाळेत प्रवेश घेतला. आमची शाळा सुरु झाली.
आम्ही आठवी. नववी, हे वर्ग पास करून आता दहावीत गेलो होतो. शाळेनी दहावीच्या वर्गासाठी रात्र अभ्यासिका सुरु केली. वेळ रात्री सात ते दहा.. आम्हाला रात्री शाळेत येण्याची भिती वाटू लागली. आणि का वाटणार नाही रस्त्याच्या दोन्ही बाजूने उसाचे मळे...रस्त्याला असणाऱ्या वस्त्यांवरची चावकी कुत्री, आणि काटेरी मोठी झाडे..त्यामुळे आम्ही सगळेजण हि रात्र अभ्यासिकेची वार्ता एकून बावरून गेलो होतो. तरीही काही पर्याय नव्हता. रात्र अभ्यासिकेला सोमवार पासून सुरुवात होणार होती. त्यामुळे आम्ही गावातील दहावीत असणाऱ्या सर्व मुलांनी यावर एक बैठकच घेतली. या महत्वपूर्ण बैठकीत महत्वपूर्ण निर्णय झाले. यातील काही खालीलप्रमाणे.....
१) आमच्या सर्व मुलांच्या मधून एक कॅप्टन निवडला..त्याची अट म्हणजे तो स्वतःहा धाडसी असावा आणि त्याने सर्व मुलांच्या पुढे आपली सायकल चालवावी. यासाठी बापू शिंदे या धडधाकट मित्राची एकमताने निवड झाली.
२) विकास कदम याची सायकल सतत पम्चर होत असल्याने ती त्याने तातडीने दुरुस्त करून घ्यावी.
३) सर्व मुलांनी बापू च्या सूचना प्रमाणे वागवे . जो सूचना पळणार नाही त्याला ग्रुप मधून काढले जाईल.
४) आणि सर्वात महत्वाचे जर एखद्याला अचानक काही अडचण आली तर सर्वांनी त्याच्या बरोबर चालत यायचे ( उदा. सायकल घोटाळा )
अशा सर्व नियमांना धरून आमची रात्र शाळा सुरु झाली..रात्रीची आमची भीती आता कमी होऊ लागली होती . आणि त्याच बरोबर आमच्यातले अनेक नियम विरघळून गेले होते. फक्त एकच नियम आम्ही पाळत होतो रस्त्याने सर्वांनी एका दमात ओरडत यायचे. त्यामुळे आमच्या कॅप्टन च्या भावना दुखावल्या होत्या. तो 'कळेल ...एक दिवस कळेल' ....अशा अविर्भावात आमच्याकडे पाहायचा. जो रात अभ्यासिका चुकवेल त्याला न चुकता मार बसायचा त्यामुळे कोणी अभ्यासिका चुकवत नसायचे. पण खर सांगू का आम्हाला तर दिवसच्या शाळेपेक्षा रात्रीचीच शाळा आवडू लागली होती.
असे दिवस उडून जात होते. थंडीचे दिवस चालू झाल्याने थंडी चांगलीच वाजू लागली होती. आता रात्र शाळेला जायचा कंटाळा येऊ लागला होता. पण दुसऱ्या दिवसाचा मार आठवला कि रात्री गेलेले बरे असे वाटायचे.
या रात्र शाळेतला एक दिवस मात्र आजही लक्षात आहे. त्या दिवशी आम्ही सारेजण सहा वाजता घरून शाळेत जायला निघालो. तर रस्त्याने जाताना बापू ने ..आज अमवस्या आहे..त्यामुळे हडळी..भूत ..असा विषय निघाला..आता हा विषय कोणालाच आवडत नव्हता पण हा विषय नको असे कोणी बोलता ही नव्हते....सर्वाना कळेल'मी भित्रा 'आहे या एकाच कल्पनेने सर्वजन बापूचा विषय ऐकत होते. सर्वजन कमालीचे घाबरले होते कारण ...रक्त...झाड ...भूत..पिसाच्या आणि झाडातील हडळ हे सर्व विषय बापू ने एवढे रंगवले होते कि यावर बापू देखील घाबरला होता.
रात्रीचे दहा वाजले प्रत्येकजण आज लवकर घरी पोहचल पाहिजे अशा विचाराने सायकल चालवत होता....आजूबाजूला भिजवलेली शेत..विव्हळत ओरडणारी कुत्री....आणि भेसूर टिटवी यामुळे वातावरण भयानक भीती दायक झाले होते. कोणी कोणाला बोलण्याच्या भानगडीत नव्हते. सर्वजन घर जवळ करत होते. एवढ्यात नेहमी प्रमाणे विकासच्या सायकलची हवा गेली. सर्व जन थांबले. पुढे जाण्यात आता प्रत्येकाला भीती वाटत होती. सर्वजन गप्प चालले होते. बापू ने पुन्हा विषयाला हात घातला. "भूत हडळीची कोण असत्यात रं."..! हा प्रश्न बापूने टाकला आणि साऱ्यांची तोंड बघण्यासारखी झाली. तेवढ्यात महादू म्हणाला "हे बघ आता भूतांचा विषय नकू ....परीक्षा जवळ आल्यात त्या पेक्षा वर्गातील विषय काढ" पण बापू काय ऐकेना..आज तो मागचा सगळा अपमान बाहेर काढत होता.
तेवढ्यात वस्तीवरील कुत्री पळतच आली ..सारे मावळे बावचळले आणि जोरात पळाले...कोण किती जोरात पळू शकतो ते आम्हाला आज कळले होते. सर्वांची घाबरगुंडी उडाली....शेवटी संभाजीची चड्डी कुत्र्यांनी फाडली होती...आम्ही थोड पुढ येऊन संभाजी ची वाट पाहत थांबलो. संभाजी चांगल्या गावरान शिव्या देत आला. त्याला सगळ्यांनी मिळून समजावले फाटलेली चड्डी सावरत संभा कॅप्टन ला शिव्या देत होता कारण कुत्री आली तेव्हा बापू सर्वात पुढ होता.
एक मोठ संकट संपवून आम्ही पुढे जायला निघालो होतो ...सर्वजन आता घाबरत घाबरत निघाली. "आजच्या दिवशी काही खर नाही बुवा आपलं......" अस म्हणत जात असताना आता सर्वच भीतीदायक जाणवू लागल होत. आणि पुढचे दृश्ह पाहून तर सर्वांची बोबडी वळली.
कारण समोरच दृश्य भयानक आणि ह्रदय बंद पाडणार होत. सर्वजन अवाक झाले होते. भीतीने काहीजण बोलत नव्हते.
समोर एक ज्वारीचे पोते रस्त्यातून इकडे तिकडे करत फिरत होत. त्याच्या एका फाटलेल्या बाजूने केसांचा झुपका बाहेर आला होता. आणि खाक्या रंगाचे ते पोते काळ्या रात्रीत हालचाली वरून भयानक दिसत होते. काय बोलावे आन काय करावे कुणाला समजत आणि सुचत नव्हते. शूर समाजाला जाणारा बापू तर रडूच लागला. भरत पुढे आला म्हणाला "आपण लांबून दगड मारू ....मग कळल काय आहे ते..." एवढ्यात विकास घाबरत म्हणाला "म्हणजी भुताची चेष्टा करायची वय...." जीवच मारलं भूत..!
सर्वजण घाबरल्याने मग गेल तर चावकी कुत्री ...बाजूला भीजवलेली शेती...आणि पुढ भुताचा भाऊ...कुठ जाव कुणालाच समजेना. शेवटी सर्वांनी भूत रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला गेल कि जोरात पाळायचे आणि गाव गाठायचे असे ठरले....मग आम्ही भूत दुसऱ्या बाजूला जाण्याची वाट बघू लागलो...ते खाक पोत....सवाकीच...चांगलाच चालत होत..आपली केस हवेत उडवत होत...आणि आमचा जीव घेत होत ...असा सारा खेळ त्या रात्री सुरु होता...सर्वांनी जय श्री राम ...बजरंग बळी कि जय म्हणत जोरात धूम ठोकली....पण नेमक भुताच्या पोत्यापशीच कुणाच्या तरी वह्या पडल्या ....आन मग भूत त्या वह्या घेऊन आमाच्या माग पळत येत होत ...आणि मागून आर वह्या तरी घेऊन जा ....अशा आरोळ्या देत होत..!
गावातील पाण्याच्या टाकीजवळ सारी पोर आली. आणि माग जीवात जीव आला . एन थंडीत आमच्या अंगातून घाम निथळत होता. आता आमच्यातला मावळा जागा झाला ...कोण आहे रे ....ये पुढे असे मोठ मोठ्याने आम्ही ओरडू लागलो ....ते पोत्यातल भूत पण आमच्या कडे येत होत ....समोर येताच त्याने आपल्या अंगात घातलेलं पोत काढल.....गावातला संपत पोतराज बघून सगळी एकमेकांकडे पाहून हसू लागली. संपत मोठ मोठ्याने हसत कशी केली गम्मत म्हणत होता...आपली लांब केस...आम्हाला दाखवत होता.....!
आम्ही कावरे बावरे झालो ....आणि आम्ही पण जोर जोरात हसाय लागलो....कोणाला काही काळात नव्हते ...पण भीती....काय असते ती मात्र अनुभवली होती....!