Type Here to Get Search Results !

आंदोलना नंतर पुढे काय ?


 देशातून भ्रष्टाचार संपवणे हे सर्वांनाच हवे आहे. मागील काही वर्षांपासून आदरणीय आण्णा हजारे यांनी या बाबत एक युद्ध उभे केले आहे. भ्रष्टाचार बाबत ते संघर्ष करत आहेत. आणि त्यांना काही प्रमाणात यश ही आले आहे. त्यांच्यामुळेच देशाला फार मोठा माहितीचा अधिकार हा कायदा मिळाला. त्यामुळे शाशकीय कार्यालयातील 'गोपनीयनावाखाली असणाऱ्या अनेक फायली लोकांसाठी उघड झाल्या. त्यामुळे जेष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांच्या कार्याला आज देशात मान्यता मिळाली आहे.  
आज देशात मागील काही दिवसापासून खूप मोठ्या प्रमाणात या विषयावर देश ढवळून निघाला आहे. लोकांच्या मनात देशप्रेम जागृत झाले आहे.हे खूप महत्वाचे आहे.
हा देश लोकशाही प्रधान आहे. लोकांना सर्व अधिकार घटनेने दिलेले आहेत. त्यामुळे विचार स्वतंत्र हे या देशातील लोकांचा प्रमुख अधिकार आहे. देशातील संसद हा एक प्रमुख भाग देशाचा मनाला जातो. कारण तुम्ही आम्ही सर्वजण या ठिकाणी जाणाऱ्या  सदस्यांना निवडून देतो.सनदशीर मार्गाने. मतदानाच्या अधिकाराने जर आपण आपले लोकप्रतिनिधी निवडून देत असू आणि परत हेच प्रतिनिधी मोठ्या प्रमाणात भ्रष्ट आहेत. असे म्हणत आंदोलन करत असू तर मग याला काय म्हणावे लागेल? त्यामुळे मतदान करत असताना आपण काय आणि कसे प्रतिनिधी निवडतो हा प्रश्न उभा राहतो.
आपला प्रतिनिधी कोण असावा या बाबत ठरवण्याचे आपल्याला पूर्ण अधिकार आहेत. मतदान करताना आपण जाणीव पूर्वक आपला प्रतिनिधी कोण हे विचारात न घेता ..कोणताही झेंडा खांद्यावर घेऊन जय जयकार करत फिरता असतो..थोडे पैसे घेऊन मतदान करण्याची सवय आपल्याला लागली आहे. मागील काही वर्षापासून धाब्यावर जेवण आणि दारू पिऊन मतदान करणे हे काही लोकांनी ठरवून टाकले आहे. यावर आपले मत असे असेल कि 'आम्ही हे करत नाही' असे म्हणून आपली बाजू आपण सावरून घेतो. या देशाचे काही खरे नाही म्हणून आपण सतत ओरडतो..पण आपल्यामुळेच देश आहे ना .!  आता वरील काही अज्ञानी अडाणी लोकांमुळे हे लोक निवडून येतात असे म्हटले तरी शिकलेली लोक मतदान करतात का? का मतदानाची सुट्टी एन्जोय  करण्यासाठी ट्रीपला जातात ? आणि वरून या देशातील सर्व पक्ष भ्रष्टाचारी आहेत. असे आपण सहज म्हणतो पण  मग सर्व पक्षांना पर्याय कधी देण्याचा प्रयत्न केला का? असे सारे प्रश्न  सामान्य माणूस म्हणून माझ्या मनात उभे राहतात.
यामुळे फक्त जनतेची जबाबदारी चांगली वागवी अशी अपेक्षा काही नेते करत असतील तर ते ही चुकीचे आहे. लाखो लोकांच्या मधून जनतेने आपल्याला निवडून दिले आहे.सत्ता आणि त्यातून पैसा मिळवणे हे जो पर्यंत बंद होणार नाही तो पर्यंत भ्रष्टाचार बंद होणे कठीण आहे. आज आपल्या देशात अनेक कायदे आहेत आणि हे सगळे लोकांना नियमातून जगायला शिकवण्यासाठी आहेत. पण या सर्व कायद्यांची कशा प्रकारे अंमलबजावणी होते हे आपण सारे जण पाहत आहोत. याचा अर्थ कायदा नको असा नाही पण कायदा होण्यापूर्वी लोकांची मानसिकता वृत्ती बदलाने आवश्यक आहे. लाच घेणे आणि देणे दोन्ही हि कायद्याने गुन्हा मनाला आहे . पण आज पर्यंत लाच देणाऱ्यांना शिक्षा झालेली आठवतेय का? 
आपण आपली कामे तत्काळ करून घेण्यासाठी आमिष दाखवतो आणि त्यासाठी भेटी, पैसे लाच स्वरुपात पुढे करतो हे सर्वात अगोदर थांबवले  पाहिजे. यात देणाऱ्यांचे प्रमाण घेणाऱ्या पेक्षा कमी असेलही पण भ्रष्टाचार थांबवण्याची सुरुवात आपल्यापासून होणे आवश्यक आहे. आण्णानाच्या आंदोलनाला जात असताना देखील जर आपण रेल्वेने फुकट प्रवास करून  जात असू आणि तिथे गेल्यानानंतर जय हिंद च्या घोषणा देत असू तर त्याला काही अर्थ राहणार नाही.
आपण सहजच अनेक गोष्टी करतो.ज्या देशाला हितकारक नाहीत. आज देशात गरिबी, आरोग्य, शिक्षण, रोजगार अशा अनेक समस्या मोठा झाल्या आहेत. पण या समस्या सोडवणारी माणस कमी होत आहेत हि एक शोकांतिका म्हणावी लागेल. आपल्याला आज देशाबद्दल आस्था आणि प्रेम निर्माण झाले आहे हि अत्यंत उल्हासित करणारी बाब आहे. पण हा उत्साह कमी होता कामा नये. देश सर्व प्रथम आणि नंतर माझा धर्म जात आणि मी ..हि संकल्पना रुजली गेली तरच या देशाला चांगले सशक्त आणि विवेकी तरुण भेटतील. आण्णा हजारे यांचे उपोषण आणि आंदोलन यातून तयार झालेल्या तरुणाने आता समाजातील अनेक कामासाठी तयार झाले पाहिजे. पण त्या पूर्वी स्वतःचे चारित्र निष्कलंक केले पाहिजे. प्रत्येक गोष्ट त्यांनीच केली पाहिजे . सर्व काम सरकारचे आहे असे सतत म्हण्यापेक्षा आपण सरकार आहोत असे म्हणणे सयुक्तिक ठरेल. 
भारत देशाला सर्वात चांगली घटना मिळाली आहे. या देशातील तरुण जागृत झाले आहेत. संविधान आणि संसद या पेक्षा या देशात कोणीही मोठे होऊ शकत नाही. देशातील करोडो लोकांना संसदे बद्दल आदर आहे. आणि संविधान आम्हाला सर्वात प्रिय हि बाब आज तरुणाच्यात ठसवणे महत्वाचे आहे. फक्त या देशात भ्रष्टाचार आहे आणि तो कधीही संपणार नाही असे नकारात्मक विचार बाजूला सारून चांगल्या सकारात्मक गोष्टी समोर आणू या..! पण याची सुरुवात आपल्यापासून करू तर आणि तरच त्याचा परिणाम समोरच्या देश बांधवावर होईल. 
     -- बिपीन जगताप 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.