Type Here to Get Search Results !

विनोदी कथा ...!


हुशारवाडीचा मोती ..!

हुशारवाडी गावचा मोती नावाचा कुत्रा एकदा फिरत फिरत जंगलात गेला. जंगलातील निर्झर झरे, मोकळे वाहणारे वारे, झाडे, वेली, पक्षी पाहत मोती हरवून जातो. जंगलाची निरव शांतता मोतिला छान वाटते. अचानक मोती थांबतो आणि मागे वळून पाहतो त्याला आपला रस्ता चुकला आहे आणि आपण जंगलात खूप आत आलो आहोत हे समजून येते. आपली वाट चुकली आहे याची जाणीव होताच मोती ला खूप भीती वाटू लागते. मोती घाबरत आता पुढची वाट चालू लागतो. शेवटी थकतो थोडे पाणी पितो. मोती ला आता चालून चालून चांगलीच भूक लागलेली असते. तो दमून भागून एका झाडाखाली बसतो. डोळे झाकून जीभ बाहेर काढून तो निवांत बसलेला असतानाच त्याला एकदम झाडातून खस खस असा आवाज येतो. मोती घाबरतो वळून पाहतो तर त्याची बोबडी वळते. त्याला लांबून एक वाघ येताना दिसतो. येणारा वाघ आता आपला फडशा पडणार या कल्पनेने मोती घाबरतो. पण येणारे संकट परतवण्याचा तो विचार करतो. तेवढ्यात वाघला मोती दिसतो वाघ आनंदाने मोठ मोठ्या डरकाळ्या फोडायला सुरुवात करतो. वाघाचा आनंद गगनात मावेनासा होतो.  मोती  वाघाच्या दिशेला पाठ करतो. ऐटीत बसून शेजारी पडलेली हाडे चघळतो आणि म्हणतो ." वाह..! काय छान आहेत वाघोबाची हाडे अशी सुंदर मांस आणि हाडे खूप दिवस खायला मिळाली नाहीत. छान असा वाघ मिळाला तर किती चांगले होईल मी देवाचा आभारी राहीन." वाघ आता जवळ येऊन मोतीचे शब्द कान टवकारून ऐकतो. पुन्हा एकदा मोतिला न्याहाळतो. त्याला आता मोती म्हणजे एक वेगळाच प्राणी असून तो आपल्याला खायला आला आहे असे जाणवते. तेवढ्यात पुन्हा आवाज येतो मोती म्हणता असतो " देवा, पाठव रे  वाघ लवकर खूप भूक लागली आहे". हे ऐकताच वाघोबा घाबरत घाबरत   ( आजूबाजूला पाहत  कोणी पहिले तर नाही ना..! कारण शेवटी जंगलच्या राजाला पण प्रतिष्टा असते )  पावलांचा आवाज न होऊ देता धूम ठोकतात. मोती मागे वळून पाहतो आनंदाने टाळ्या पिटतो. 


...
आणि तेवढ्यात............मोतीच्या समोर 
झाडावरून एक टून दिशी  उडी मारून माकड हजर होते. .... " हा.. हा.. हा.. तुझी  सगळी नाटकं मी झाडावरून पहिली आहेत. कुत्र्या. आमच्या जंगलात येऊन आमच्या राजाला फसवतोस. आता तुला मी सोडणार नाही. आताच्या आता वाघोबांना जाऊन सगळे सांगतो. इथेच तुझा खातमा करतो " हे ऐकताच मोती घाबरतो. आपली सगळी लबाडी या माकडाने पहिली आहे आता आपले काही खरे नाही हे मोतीचा लक्षात येते. तो माकडा पुढे दोन्ही पायाचे पंजे ( हात जोडून ) उभा राहतो आणि म्हणतो " माकडोजी राव आमचे चुकले माफ करा. क्षमा करा मी परत अशी लबाडी करणार नाही " पण माकड ऐकत नाही. ते म्हणते " का रे कुत्र्या एकदा मी  तुमच्या गावात चुकून आलो होतो ( रुसून ) तर सगळ्या गावातल्या कुत्र्यांना एकत्र करून मला गावातील प्रत्येक  गल्लीत पळवले  होते ( शिवाय त्या शाळकरी पोरांनी दगड मारून माझा पार्श्वभाग लाले लाल केला होता) त्या सगळ्याचा बदला मला घायचा आहे. आणि जर मी हि तुझी लबाडी वाघोबांना सांगितली तर ते माझे मित्र होतील त्यामुळे आता मी तुला चांगलाच धडा शिकवतो" 
यावर मोती काही बोलला नाही. चूक झाली आता परत असे होणार नाही. एकदा माफ करा अशी विनवणी मोती करू लागला. पण माकड ऐकण्यास तयार नव्हते. शेवटी माकडाने सांगितले "तू आता इथेच थांब मी वाघोबांना घेऊन येतो. आणि तू पळालास तरी तुला आम्ही शोधून काढतो "    आणि माकड वाघोबांकडे गेले..!

इकडे वाघोबा आपल्या घरी येऊन धापा टाकत बसलेले असतात. "कोण असेल हा प्राणी वाघ खाणारा? वाघाला खातो म्हणजे काय ? पण तो कुटून आला असेल? असे प्रश्न मनात आणत विचार करत वाघ बसला होता. तेवढ्यात बाहेरून आवाज आला " महाराज अहो महाराज" आहात का घरात ? वाघ दचकला त्याला वाटले तोच प्राणी आला परत आवाज बदलून. वाघ उठला त्याने कपारीच्या फटीतून पहिले तर बाहेर माकड होते. उसासा टाकत वाघ बाहेर आला. उसने अवसान आणत म्हणाला "का रे माकडा"? का आलायास  ..." ? यावर माकड म्हणाले " अहो महाराज मघाशी तुम्ही जे भिऊन पळाला ..." ( यावर वाघ घाबरला याने बघितला काय मघाचा कार्यक्रम..अरे बाप रे आता हे माकड सगळ्या जंगलात सांगणार ..)  वाघ घाबरत  म्हणाला " काय.. कुठे... कोण पळाले..? " मग माकडाने सगळे सांगितले . 
वाघ कसनुसा हसतो माकडाला म्हणतो 'आयला..!  साध्या कुत्र्याने आम्हाला घाबरवले. आमची चेष्टा झाली. आणि शिवाय तू बघितली". आता मात्र संतापाने वाघ डरकाळी फोडू लागतो. कधी एकदा त्या कुत्र्याला खावून टाकतो असे झाले. शेवटी झपा झपा पावले टाकत वाघ कुत्र्याच्या दिशेला निघतो. आता माकड आनंदाने उद्या मारते. आपला बदला पुरा झाला याचा मोठा आनंद माकडाला झालेला असतो.
....
वाघ येताना दिसताच मोती पुन्हा आहे तीच पोझ घेतो. आणि परत ती पडलेली हाडे गोळा करतो. आणि जोर जोरात ओरडतो " किती वेळ झाले या माकडाला वाघाला आणायला पाठवून ...  ! अजून आले नाही. आज मला तो वाघ खायचा आहे. या माकडाला एवढे बक्षीस देऊन सुद्धा माकड अजून वाघाला घेऊन येत नाही म्हणजे काय .? मी आज तो वाघ खाणारच...! ये रे माकडा त्याला घेऊन लवकर ये ...! " हे ऐकताच वाघ प्रचंड घाबरतो आणि शेजारी चालणाऱ्या माकडा कडे रागाने पाहतो. माकड नाही म्हणत मन हलवतो. तो पर्यंत वाघ माकडाला मारून पुन्हा जोराची धूम ठोकतो ...आता मात्र मागे वळून देखील पाहत नाही ...!

@ बिपीन जगताप