Type Here to Get Search Results !

ये रे..! ये रे पावसा ....!

ये रे..!  ये रे पावसा ....!

जेष्ठ आषाढ महिना आला कि शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसतात. काळे ढग दिसताच आनंदाने नाचतात. पण अजूनही गार हवा येईना....पांढरे ढग काळा रंग घेईनात...भेगा पडलेली धरती  वाट पाहतेय पावसांच्या धारांची चिंब होण्यासाठी...लहान मुले अंगणात फेर धरून उभी आहेत पावसात नाचण्यासाठी...तहानेने व्याकूळ झालेली जनावरे आशेने आभाळाकडे पाहत आहेत. सुकलेली झाडे वाट पाहत आहेत वरुण राजाची.... सगळ्यांना हवा हवासा वाटणारा पाऊस अजूनही पडत नाहीये. काळजी वाटतेय. पंढरीची वारी पंढरपुरच्या दिशेने चालू लागली आहे. पंढरीच्या पांडुरंगाला भेटण्यासाठी लोकांचा महापूर वाहतोय पण सगळ्यांना पावसात चिंब होण्याची आस आहे, पंढरपुरच्या विठ्ठलाला एकच साकडे घालतायेत पडू दे पाणी....मिळू दे पाखरांना गाणी...!
पावसानं हुलकावणी दिली कि हवालदिल होतात ते शेतकरी..मान्सून येणार या बातम्या कानावर आल्या तरी शेतकरी आनंदाने फुलतो. तो बरसणार शेती हिरवीगार करणार...मातीचा वास सुटणार...जीवनातील आनंदाचा क्षण तो घेऊन येणार या कल्पनेत शेतकरी असतो. पण मागील काही वर्षापासून पाऊस वेळेवर येत नाही आणि मग शेतकर्याचे संपूर्ण वर्षाचे नियोजन चुकते. शेती कडे पहावेनासे होते. जगाच्या पोशिन्द्याला जगणे नकोसे होते. मोठ्या प्रमाणात झालेली वृक्ष तोड, वाढत चाललेले तापमान, प्रदूषण या  सगळ्या गोष्टींचा परिणाम पावसावर झालेला आहे हे दिसून येते. आपण सगळेच थोड्याफार प्रमाणत जबाबदार आहोत या सगळ्यासाठी आत्मकेंद्री जगण्याच्या सवई मुळे आपण दुसर्याचे जगणे हिरावून घेत आहोत, आपण सुखी होण्यासाठी दुसऱ्याचे सुख ओरबाडत आहोत. पण यामुळे आपण अजून साग्ल्यापासून लांब जात आहोत याचे भान आपल्याला नाही. निसर्ग आणि आपण वेगळे आहोत असा समाज आपण करून घेतला आहे. निसर्ग देण्यासाठी आहे. आपल्या जवळचे सगळे तो आपणाला देत असतो पण संयम नसलेला माणूस तो देण्यापूर्वीच ओरबाडून घेतो आहे. फक्त सिमेंटची घरे बांधून आणि डांबरी रस्ते बनवून जगात इंटर नेटच्या माध्यामतून पोहचून आपणाला मानसिक शांती समाधान मिळू शकणार नाही.
पावसा पावसा ये रे तुला देतो पैसा हि लहान मुलांची गाणी आपल्याला आता बदलावी लागतील.पावसा पावसा ये रे तुला देतो झाड, त्यासाठी लहानग्यांवर पैश्या एवजी वृक्ष वेलींचे संस्कार झाले पाहिजेत. प्रत्येकजण निसर्गापासून दूर जातोय जो आपली काळजी घेतो जो जगवतो आणि जीवनभर साथ देतो त्यापेक्षा कृत्रीम बाबींना सलाम करणारी पिढी घडवत असताना आपल्याला जाणीव राहत नाही आपण पुढच्या पिढीला काय देत आहोत.
जुन्या काळी एक आजोबा आंब्याचे रोप लावत होते.नातू जवळ येतो आणि विचारतो "आजोबा पण हे झाड मोठे होऊन आंबे देईल त्यावेळी तर तुम्ही नसाल मग हे झाड कशाला लावताय"? आजोबा शांतपणे म्हणाले " "बाळ तू तर असशील ना ..! या उत्तरात सगळे निसर्गाचे गुपित आहे .  पुढच्या पिढीची अशी काळजी घेणारे आजोबा प्रत्येक घरात जन्माला येतील त्यावेळी हा पाऊस कोसळेल आनंदाने बेहोष होऊन आपले दान तो धरतीला आनंदाने देईल .
पाऊस येईल....झाड हिरवीगार होतील...आनंदाने सगळे बागडू लागतील पक्षांना गाणी सुचतील...निसर्गाचे
मायेचे हात अंगावरून फिरतील....पुन्हा आपण निसर्गाजवळ जाऊ ....वृक्ष वेलींवर प्रेम करू ...!

- बिपीन जगताप