Type Here to Get Search Results !

सरत्या वर्षाला निरोप देताना ….!

सरत्या वर्षाला निरोप देताना ….!

२०१५ या वर्षाचा दिवस आज आता थोड्याच वेळात मावळेल. उद्या पुन्हा नवीन वर्ष सुरु होईल. सरत्या वर्षाला निरोप देताना आठवणी मनात दाटून येतात. २०१५ या वर्षात आपण काय केले. दिवस येतात जातात वर्षामागून वर्ष सरतात… आयुष्याचा काळ असा पाहता पाहता वाळूसारखा निसटून जातो.  सगळ्यात अचंबित करणारी बाब म्हणजे वर्ष इतक्या लवकर कशी सरतात हेच उमजत नाही  ….बघता बघता आयुष्याची वर्ष अशी सरून जातील आणि वार्धक्य समोर उभे राहील असे वाटायला लागते. दर वर्षी अनेक संकल्प केले जातात पण तडीस मात्र एकही जात नाही. मग आजच्या तारखेला वाटायला लागते हे पण वर्ष असेच निघून गेले. मनाच्या  निर्धाराला ज्या वेळी ह्रदयाची जोड मिळते त्याच वेळी संकल्पाची होडी तीराला लागते.
  आयुष्याच्या संध्याकाळी काहीतरी समाधानकारक आठवणं ठेवायची असेल तर डोक्यावरील सूर्याच्या साक्षीने घाम गाळावा लागतो . पाहिलेली स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी जीद्धीने स्वप्नांचा  पाठलाग करावा लागतो …. म्हणजे मावळतीच्या सूर्याच्या लालीत आपला चेहरा समाधानाने फुलून येतो. मग कातरवेळ हि निराशाजनक न राहता ती जीवनाची दिवाळी बनते.
२०१५ ची आठवण माझ्यासाठी थोडी दुखहःदायक आहे. माझे आजोबा या वर्षी आम्हाला कायमचे सोडून गेले…कष्टकरी माणसाच्या जीवनाची संध्याकाळ प्रसन्न  झालेली मी पहिली आहे. मरणाचा सोहळा देखणा करण्यासाठी दुपारची  उन्हे या माणसानी अंगावर झेलली होती.
मला नेहमीच सगळ्या गोष्टी एका चक्रात फिरत आहेत असेच  वाटते . स्थिर असणार्या सूर्याला पृथ्वी फेरी मारतेय पण आभासी जगात तर  सूर्य पृथ्वी भोवती फिरतोय हे जाणवू लागते आणि मग सुरु होतो खेळ कालगणनेचा … वेळ मोजला जातो… वेळेला दिवसात मोजले जाते ….दिवसाल महिन्यात आणि महिन्यांना वर्षात मोजण्याच्या खेळात आयुष्य सरकत राहते. सकाळच्या कोवळ्या उन्हासारख बालपण प्रसन्न…. आनंदायी चिंतामुक्त … दुपारच्या उन्हासारख तारुण्य।  तापट…कणखर …बेधडक . आणि मग दिवस सरकतो तसे वार्धक्य जवळ येते…कमजोर… निराधार …!
 उन्हाचा खेळ संपू लागतो …. दिवस मावळतीला जातो. केशरी रंगानी आभाळ भरून येते… सकाळ पासून सुरु झालेला दिवस असा रंगांची उधळण करत कलतो…. आणि बघता बघता ढगाआड निघून जातो. नव्याची सुरुवात करण्यासाठी …!
माणसाच्या आणि या उन्हाच्या खेळात मला नेहमीच साम्य  वाटते.
या वर्षाचे काही तास क्षण आपल्या जवळ आहेत. थोड्या वेळेत  ढगाआड   जाणारा  सूर्य कदाचित उद्या असेलही पण हातातून निसटून जात असलेला क्षण नक्कीच उद्या नसेल… भविष्यातील चिंतेने काळजीने आणि भूतकाळातील वाईट घटनेने आजचा वर्तमान आपण नको जगायला.
उद्या नवा दिवस उगवेल  …आयुष्यातील नव्या वर्षाचे स्वागत करूयात….  नवी आशा … नवी उमेद घेत पुन्हा नव्या वर्षाला सामोरे जावूया .
जीवनातील अनेक गोष्टींचा साक्षीदार जाणारा काळ असतो. आपण आयुष्यात अशाच गोष्टी करू यात कि जीवनाच्या संध्याकाळी आपल्याला त्या हव्या हव्याशा वाटतील. आपल्या आयुष्यात सकारात्मक आनंदायी बदल घडवण्यासाठी आपणच तयार राहू …. गेल्या वर्षी झालेल्या चुकांची पुनरावृत्ती या वर्षी होऊ नये हाच संकल्प करतो …आपले  प्रेम आणि स्नेह कायम राहो वृद्धिंगत होवो याच शुभेच्छा…।

- बिपीन जगताप              


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.