Type Here to Get Search Results !

प्रजासत्ताक दिनाचा सोहळा

थंडी असली तरीही 26 जानेवारी ची पहाट आमच्या लहानपणी दिवाळीची पहाट असायची ....चुलीवरल्या गरम पाण्याची आंघोळ आणि शाळेची जूनी असली तरी तांब्याच्या इस्त्रीची कपडे...नव्या कपड्यांपेक्षा जास्त आनंद द्यायची. मुलांपेशा प्रजासत्ताक दिनाचा आनंद कुटुंबात जास्त होता.
सकाळी शाळेची भली मोठी घंटा खणखण वाजायची. देशभक्तीपर गीतांनी सगळं गाव  भारुन जायाच...थंडीच्या कडाक्यातही देशभक्तीचा उबदारपणा सार्या गावाला जाणवायचा....जीवन शिक्षिण विद्या मंदीर असलेली शाळा नव्या नवरीगत नटायची..आंनद ...उत्साह ...जोश ...पावसाळ्यातल्या नदीसारखा अखंड वाहत असायचा..!
"एक रुपया चांदीचा ...देश आमचा गांधीचा...." .भारत माता कि जय....या घोषणांनी गाव दणाणून जायाचा....प्रभात फेरी म्हणजे....आपलंच गाव ....पण ऐटीत ...अभिमानाने पाहण्याचीच मौज.... घराजवळून प्रभात फेरी जायाची त्यावेळी घराच्या कोपऱ्यावर आई,  आजी उभी राहून आपल्या पोरांना कौतुकान बघायची....नकळत आईच्या डोळ्यात पाणी तराळायचं....सगळ्या गावाचा सहभाग असलेली ही फेरी खरंच न्यारी असायची.
शाळेच्या ग्राउंडवर कवायत रंगात यायची... .....मग जोरदार आवाज यायचा ...'सावधान'  आणि तिरंगा फडकायचा...... झेंड्याला सलामी देताना इवलूशी छाती देशभिमानानी भरुन यायची.
गेल्या दोन आठवड्यापासून सुरु असलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांच्या तालमींचा निकालाची वेळ आता येउन ठेपते.. बोबड्या बोलीपासून सुरु झालेला कार्यक्रम रंगत जातो...कौतूकाच्या ....बक्षीसांची पाठीवर  थाप मिळायची..गुरुजी खूश....!
अध्यक्ष माशय....गुरुजन वर्ग...आणि इथे जमलेल्या माझ्या बंधू आणि भगणिंनो.....अशी सुरुवात करुन  सुरु  झालेली भाषणे मग तासभर चालायची.
अशा प्रकारे .....सर्व कार्यक्रमांची रेलचेल असायची.
शेवटचा गोड कार्यक्रम बिस्किट वाटपाचा असायचा....पार्ले ...बिस्किट म्हणजे जीव की प्राण....असायचा......!
२६ जानेवारी हा प्रजासत्ताक दिन आहे..पण लहानपणी तो आमचा आनंद सोहळा असायचा.......दिवाळी प्रमाणे.....तो साजरा केला जायाचा.....देशभक्तीचा असा सोहळा आता लोप पावत चाललाय....कोवळ्या मनावर देशभक्ती रुजण्यासाठी आनंददाई वातावरण निर्मीतीसाठी ....पुन्हा लहानपणीची २६ जानेवारी शाळेच्या अंगणात उतरावी.

- बिपीन जगताप

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.