रविवार माझ्या आवडीचा ...!
मागच्या वीस पंचवीस वर्षांपूर्वीचा रविवार आज आठवला कि मन भूतकाळात जाऊन बसत..... परत वर्तमानात यायला तयार नसत... एवढं ते संवेदनशील होत. मागल्या अनेक गोष्टी माणसाला आठवतात त्या सुखकारक तश्याच दुःखकारकही असू शकतात अनेकदा तत्वज्ञानी लोक सांगतात भूत आणि भविष्यात रमण्यापेक्षा वर्तमानात जगा हे सांगण्यासाठी सोपं आहे पण माणसाला भूतकाळातील बालपणीचा काळ हुरहूर लावतोच...!
या सुखद रमणीय काळातून बाहेर पडायला माणूस सहजा सहजी तयारच होत नाही.
मलाही आज बालपणीतला रविवार आठवला दूरदर्शन वर लागणारी रंगोली अंथुरणातून बाहेर काढत नव्हती. सकाळी सात वाजता लागणारी रंगोली आठ वाजता संपायची मग बच्चे कंपनी उठायची.
लहानपणीच काळ सुखाचा असे म्हटले जाते पण तो काळ खरंच सगळ्यांचाच सुखाचा असतो ..पण सगळ्यांपेक्षा तो आम्हाला जास्तच सुखाचा वाटतो. सगळा रविवार धमाल मस्ती मज्जा असायची.
गोट्यांचा डाव जांभळाच्या झाडाखाली रंगायचा. गोटीला नेम लागू नये म्हणून कुणी गुढघे खाजवायचा. क्रिकेट टीम मध्ये धमाल असायची दिवसभर जेवणाचं भान नसलेली पोर क्रिकेट खेळायची.
आजच्या मुलांना मोठ्यांसारखं व्हाट्सअप येत. फेसबुक येत..शेकडो चॅनेल मधून ते कार्टून पाहतात. म्हणजे आज खूप मनोरंजनाचा सुकाळ आला असे म्हणावे पण जी गावाकडची मस्ती मज्जा आणि पोरांचा गलका असायचा तो आज कुठे तरी हरवला आहे.
अभ्यासाच्या ओझ्याने मूल वाकलेली असताना तकलादू मनोरंजनात गुंतलेली असताना आभासी जगात त्यांना जवळच कोणी वाटतच नाही. त्यामुळे ते कमी वयात व्यसनांकडे वळत आहेत आपुलकी आणि मायेच्या अभावामुळे ती दुरावणार नाहीत याची काळजी घ्यायला हवी.
आमच्या रविवारी नऊ वाजता महाभारत लागायचं, दहा वाजता मोघली आणि दुपारची आकाशवाणीवरील आपली आवड रविवारची सकाळ भरून टाकायचे. नंतर दुपारी नदीवर पोहणं असायचं ..मुलांनी एकत्र उड्या मारणे आणि पाठशिवणीचा खेळ करणे म्हणजे पाण्याला पण हरवण्यासारखे होते. छोटी छोटी गावठी बोर...आंबट चिंचा .....गाभुळलेल्या चिंचा जीव कि प्राण असायच्या. पोहल्यानंतर लागणारी भूक जबरदस्त असायची. पोहून पोहून लाल झालेले डोळे आणि गोट्या खेळून फुटलेले गुढगे रविवारची मस्तीची खूणगाठ असायची.
कुटुंब एकत्र होती आई ,आज्जी, आत्या, काकू कुणीतरी नदीवर बोलवायला यायचे त्यावेळीच पोहणं बंद व्हायचं. पोहण्यासाठी आणि चिंचेच्या झाडावर चढण्यासाठी पैंज लागायची. ती पैज जिंकण्यासाठी जीवाचा आटापिटा होत असे. आठवड्यातील सुट्टीचा दिवस म्हणून रविवार असायचा संध्याकाळी चार वाजता मराठी चित्रपट लागायचा सगळं घर तो चित्रपट बघायचं...आम्ही लहान मुलं पिक्चर बघताना कोण कोण रडतेय ते बघायचो ...याचा घरातील मोठ्या लोकांना राग यायचा.
आज सुट्टीचा दिवस रविवार आठवला कि मनाला हूर हूर लागते. जुन्या दिवसातील पोरांना परत गोळा करता आले असते तर किती छान झालं असते. पुन्हा चिंचा बोर पाडता आली असती. लहानपणीच्या मोगलीची म्हणूनच वारंवार आठवण येते.
सध्या काळ झपाट्याने बदलतोय अनेक अर्थाने जग जवळ येतेय पण मुलांचे विश्व कमी होतेय हे वास्तव आपण स्वीकारणार आहोत कि नाही ?
_- बिपीन जगताप