Type Here to Get Search Results !

माणूसकीचा पाऊस..!

माणूसकीच्या ओलाव्याने मुंबईकर चिंब....!

काल मुंबईवर आभाळच फाटंल होत. धुवाधार पाऊस मुंबईतील सिमेंटच जंगल धूवून काढत होता. नाल्यांचा गाळ समुद्राकडे घेऊन जात होता. झाडांच्याबरोबर मस्तीत गाणं गात वारा घोंघावत जात होता.
ईतभर पोटाच्या चाकरीसाठी बाहेर पडलेली माणसं या भयाण दिवसाला आज सामोरी जात होती. संकटाशी झुंजण्याची आणि संघर्ष करण्याची जन्मजात शक्ती घेऊन  मुंबईकर दिवसा झालेल्या काळोखाला बघत कार्यालयांना जवळ करीत होती. काळ्या, पांढऱ्या रंगीत छत्र्यांची वार्याला तोंड देताना तारांबळ उडत होती.
सैराट माणसासारखा समुद्र आज आपली मर्यादा ओलांडण्यासाठी आतूर झाला होता. वीस पंचवीस फुटांच्या आक्राळ विक्राळ लाटा डांबरी रस्त्यावर येऊन आदळत होत्या...समुद्रातील तुफान...आभाळातले काळे ढग आणि बेंधुद वारा याची न तुटणारी युती माणसांच्या तकलादू राज्यावर आज चालून आली होती.
मोठ्या तंत्रज्ञानाच्या, शहाणपणाच्या गोष्टी सांगणारा आणि निसर्गाला आपल्या काबूत ठेवतो म्हणणारा माणसाचा अभागी जीव आज लाचार झाला होता. माणूस अनेकदा निसर्गाच्या या अफाट शक्तीपुढे लुळा पांगळा होतो. मुंबईच्या माणसांच्या गर्दीला भिडण्यासाठी आज आस्मानी संकट जय्यत तयारीनिशी आलं होत.
तुफानाला भिडण्याची शक्ती ना माणसात ना प्राण्यात...!
काळ्या ढगांनी सगळचं पाण्याचं दान धरतीला देण्याचा चंगच बांधला होता पण ते दान पदरात घ्यायला पदरच नव्हता...पडलेल पाणी मुरतही नव्हत आणि वाहतही नव्हत...निसर्गाची कृपा आज अवकृपा होत होती. पाण्यानं मुंबापुरी मनसोक्त भिजत होती भरत होती.
रोज चालणारी, पळणारी माणसं आज थांबली होती. पावसानं त्यांच्या पायात पाण्याचे जोखंड अडकवले होते. संकटात माणूस एकत्र येतो हे प्रत्यक्ष दिसत होते. भैय्या, भाई, मराठी, अमराठी भेद पाऊस धुवत होता आणि माणूसकिची नाती जोडत होता. ओल्या अंगानी मायेचा ओलावाही दिसत होता.
उभे राहीलेल्याना बसा म्हणत होते. पावसात अडकलेल्यांना घरी आग्रहाने नेत होते. जेवणाची तयारी करीत होते. झोपण्यासाठी निवारा देत होते. माणूसपणाचा पाऊसच पाडत होते. महिलांना प्राधान्य देत त्यांच्या सुरक्षित राहण्याची काळजी घेत होते. रेल्वेच्या डब्यातील माणस सुरक्षित बाहेर काढत होते. कंबरेएवढ्या पाण्यातून घराची वाट शोधणारी माणसं हा माणूसपणा पाहून सुखावत होते. जाती धर्माच्या, भाषिक, प्रांतीय भेदाच्या पलिकडला हात आज माणसानी हातात घेतला होता.
निसर्गाच्या या वादळाला माणूसपणाचे वादळ धडकत होते आणि या मायेच्या ओलेपणाने मुंबईकर आतून चिंब चिंब भिजत होते.

 - बिपीन जगताप
 www.bipinjagtap.blogspot.com
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.