महाक्रांतीची मशाल सावित्री
"सावित्री तुला शिकता येईल आणि शिकवता देखील येईल"
असा दमदार आत्मविश्वास सावित्रीबाईंनी विचारलेल्या भाबड्या प्रश्नाला ज्योतीबांनी दिला.... आणि सावित्रीबाईंनी स्त्री शिक्षणाची क्रांती केली.
क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले यांच्या खांद्याला खांदा लावून समाज विघातक शक्तींबरोबर लढत 'सावित्री ज्योतीबा फुले' या महिलेने स्त्री शिक्षणाची मुहुर्तमेढ रोवली आणि ती घट्ट केली.
समाजातील सर्वच महिलांनी शिकावे म्हणून दगड धोंडे, शेणगोळे ही बाई फुले समजून झेलत राहीली. शिव्यांची वाहीलेली लाखोली ही बाई सहन करीत राहीली.अनाथांची माय होत या बाईंनी विधवा आणि त्यांच्या मुलांना आपलं फक्त घरच नाही तर प्रेमाचं हृदय देखील दिले...!
प्रचंड विघ्नसंतोषी समाजाबरोबर संघर्ष करीत सावित्रीबाईंनी मानवतावादाची आणि समतेची लढाई लढली.
एका ध्येयवेड्या पतीला साथ कशी द्यावी याचे मुर्तीमंत उदाहरण सावित्रीने जगाला दाखवून दिले आहे. आयुष्यभर सावित्री लंकेची पार्वती बनून राहीली. लोकांच्यातील धर्माचा आणि त्यातील अंधश्रद्धेचा पगडा दूर करण्याचा अतोनात प्रयत्न केला. ज्योतीबांची सावित्री सावली बनली. पतीचे ध्येय घेऊन आयुष्यभर जगली.
'एक पुरुष शिकला तर तो एकटाच शहाणा होतो पण एक बाई शिकली तर सारे कुटुंब शहाण होत' हे ज्योतीबांच ब्रीद वाक्य सावित्रीबाईंनी खरे करुन दाखवले आहे.आज महिलांनी प्रचंड यश कमावले आहे पण सावित्रीबाईंचा जन्मदिवस त्यांनीच नव्हे तर कोणीही विसरता कामा नये. अजही महिलांना आत्मसन्मानाची लढाई लढावी लागते आहे. हुंडाबळी आणि मुलगाच हवा या मानसिकतेतून स्री ची सुटका झालेली नाही आणि तरीही यासाठी कोणी पुढाकार घेत नाही मात्र प्रचंड धर्माचा पगडा असताना देखील एका ध्येयाने प्रेरीत होऊन स्त्री शिक्षणासाठी फूले दाम्पत्यांने केलेले प्रयत्न जागतीकस्तरावर देखील कोणी केले नाहीत.
आपल्या जाती धर्माचा चष्मा काढा आणि संकुचीत दृष्टीकोन बाजूला ठेवून एकदा बघा तुम्हाला हे महापुरुष मानवतावादाची सदैव प्रेरणा देत राहतील त्यांना आपल्या कोत्या मानसिकतेतून जातीत बंधीस्त करु नका ही विनंती....!
"शेठजी तुमचा समाजसेवेचा वारसा ही तुमची सावित्री श्वासात श्वास असे पर्यंत जपेल"
असा शब्द शेवटच्या क्षणी आपल्या पतीला देणारी सावित्री पुन्हा होणे नाही.
आज सावित्रीबाईंचा जन्मदिवस.... महाक्रांती करणाऱ्या सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा ...!
- बिपीन जगताप www.bipinjagtap.blogspot.com