![]() |
फोटो सौजन्य - गुगल |
नको नको रे पावसा
असा धिंगाणा अवेळी :
घर माझे चंद्रमौळी
आणि दारात सायली;
नको नाचू तडातडा
असा कौलारावरून :
तांबे-सतेली-पातेली
आणू भांडी मी कोठून?
-इंदिरा संत
कालचा पाऊस आमच्या
गावात आलाच नाही,
आम्ही आसवांनी शेते भिजवली..
-यशवंत मनोहर
ए आई मला पावसात
जाऊ दे ।
एकदाच ग भिजुनी
मला चिंब चिंब होऊ दे ।।
मेघ कसे बघ
गडगड करिती ।
विजा नभांतुन
मला खुणविती ।
त्यांच्यासंगे अंगणात मज
खूप खूप नाचु दे ।।
-वंदना विटणकर
नभं उतरू आलं,
चिंब थरथर वलं ।
अंग झिम्माड झालं,
हिरव्या बहरात ।।
अशा वलंस राती,
गळा शपथा येती ।
साता जल्मांची प्रीती,
सरंल दिनरात ।।
वल्या पान्यात पारा,
एक गगन धरा ।
तसा तुझा उबारा,
सोडून रीतभात ।।
नगं लागंट बोलू,
उभं आभाळ झेलू ।
गाठ बांधला शालू,
तुझ्याच पदरा ।।
-शांताबाई शेळके
भेट तुझी माझी स्मरते
अजुन त्या दिसाची ।
धुंद वादळाची होती
रात्र पावसाची ।।
कुठे दिवा नव्हता,
गगनी एक ही न तारा ।
आंधळ्या तमातुन वाहे
आंधळाच वारा ।
तुला मुळी नव्हती बाधा
भीतिच्या विषाची ।।
-मंगेश पाडगांवकर
![]() |
पाटगाव कोल्हापूर |
मन चिंब पावसाळी
झाडात रंग ओले ।
घनगर्द सावल्यांनी
आकाश वाकलेले ।।
पाऊस पाखरांच्या
पंखांत थेंब थेंबी ।
शिडकाव संथ येता
झाडे निळी कुसुंबी ।।
मन चिंब पावसाळी …….
-ना. धों. महानोर
ढग दाटून येईल,
झाड नवीन होईल..
-अरुणाताई ढेरे
कणा
ओळखलंत का सर मला पावसात आला कोणी..?
कपडे होते कर्दमलेले केसांवरती पाणी
क्षणभर बसला नंतर हसला बोललं वरती पाहुनी
गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहुनी
माहेरवाशीण पोरीसारखी चार भिंतीत नाचली
मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली
भिंत खचली चूल विझली होते नव्हते गेले
प्रसाद म्हनुनी पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले
कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे
पडकी भिंत बांधतो आहे चिखल गाळ काढतो आहे
खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला
पैसे नकोत सर मला जरा एकटेपणा वाटला
मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा
पाठीवरती हात ठेऊन नुसते लढ म्हणा ..!!
- कुसुमाग्रज
मोकळा उदासीन वारा,
नभ भरून आले वरती,
गाण्याच्या जन्मासाठी,
अन मनात भिजते माती..
-अरुणाताई ढेरे
आला आला वारा
संगे पावसाच्या धारा ।
पाठवणी करा सया
निघाल्या सासुरा ।।
- सुधीर मोघे
नाही कधी का तुम्हास म्हटलं,
दोष ना द्यावा फुका ।
अन् राया मला, पावसात नेऊ नका ।।
लई गार हा झोंबे वारा ।
अंगावरती पडती धारा ।
वाटेत कुठेही नाही निवारा ।
भिजली साडी भिजली चोळी,
भंवतील ओल्या चुका ।।
अन् राया मला,
पावसात नेऊ नका ॥
( लावणी )- वसंत सबनीस
थेंबांना सावरलेल्या,
त्या गवताच्या काडांचा,
पाऊस पडून गेल्यावर,
मी भिजलेल्या झाडांचा..
किशोर कदम