सुरवडीच्या हिरबा मोहित्यांच्या घरी पहिली कन्या म्हणून विजूबाईचा जन्म झाला. हिरबा आणि सरूबाईचे पहिले अपत्य असल्याने लाडाकोडात विजूबाईचे पालनपोषण झाले. कांबळेश्वर गावच्या ज्ञानबा माऊली यांनी आपला थोरला पोरगा भगवान याच्यासाठी विजू बाई ला पसंद केली. विजूला पहिल्यांनंतर भगवानच्या गालाची खळी चांगलीच खुलली होती. गोरीपान विजू आपल्या पदरात पडल्याने भगवान'ला आभाळ ठेंगणं झालं होत.
मार्गशीर्ष महिन्यात कडाक्याची थंडी पडली होती अन विजू आणि भगवानच्या लग्नाचा मुहूर्त पण यांचं महिन्यात निघाला होता. दोन बैलगाड्या आणि दोन चार फटफट्या घेऊन हिरबा वऱ्हाड आणि नवरीला घेऊन कांबळेश्वरला आला. विवाह गोरस मुहूर्तावर संध्याकाळी सहा वाजता पार पडला.
थंडीचा कडाका असल्याने पांच पंचवीस माणसं रात्रभर शेकत गाणी ऐकत बसली. दुसऱ्या दिवशी माणसं पांगली.
नव्या नवरींन पौष महिना सुरवडीला काढला आता लाडक्या लेकीला हिरबाने कांबळेश्वरला सोडले आणि खऱ्या अर्थाने आता नांदणे सुरु झालं. विजू'चा संसार सुरु झाला. नवरा चांगलं होता.
सासू सासरा नणंदा आणि दीर यांचा मोठा घरोबा असल्याने विजू संसारात रमली.
नव्याचे नऊ दिवस संपले परिस्थितीनुसार संसारात भांड्याला भांड लागू लागल...नवरा जेवढा प्रेम करायचा त्याच्या डबल विजूच्या चुकांवर पोटभर मारायचा...
विजूला पहिला मुलगा झाला पण कमी दिवसाचा असल्याने तो मरण पावला विजू आणि भगवानला दुःख झाले नंतर दुसरा मुलगा झाला त्याच नाव बापू...गोरापान पोरगं झाल्याने घरात आनंद झाला. 'टसानामी दिसतोय' असं म्हणून विजू पोरात आता चांगलीच रमली.
लगीन होऊन पोरग झालं तरी गडी काय कामाला जाईना हे बघून ज्ञानबा आप्पा चांगलाच खवळला आणि याच कारणाने विजू आणि भगवानला त्याने वेगळं ठेवलं.
दिस सरत होते तसा संसार चांगलाच रंगला होता कष्टाने भगवान आता पुढं जात होता त्याला विजूची साथ मिळाली होती. रागीट भगवानचा संसार करणं खरं तर तारेवरची कसरत होती. काय ना काय कारण देत भगवान गुराढोरासारखा विजू ला मारायचा या माराची कारणं अगदी शुल्लक असली तरी भगवान त्याचा नेम चुकू द्यायचा नाही.
भगवान कामाला गेला कि सासूची किरकिर तिच्या मागं लागायची. सासू उठता बसता विजू ला टोमण देत भांडत होती विजू पण 'हिरबाची लेक म्हणत तसूभर माग सरकत नव्हती.अगदी आजूबाजूला ऐकू जाईल अशी भांडण असायची.
या सगळ्यात विजूबाई तावून सुलाखून निघत होती. भल्या भल्याची कशी जिरवायची हि कला आता तिला चांगलीच अवगत झाली होती.
दिवसा मागून दिवस जात होते कधीतरी आपलं पण चांगलं दिवस येतील या अपेक्षेने विजू संसार रेटत होती. पोर मोठी झाली कि आपल्यावर झालेला अन्याय अत्याचार कमी होईल या भरवश्यावर तीची जिंदगी सूरु होती.
एकामागून एक अशी दोन मूल झाली. यामध्ये आता बापू च्या सांगतील छोटू आला. दोन मुलांनंतर मुलगी झाली. मुलीचं नाव विजू ने आपल्या आवडीने 'विद्या' ठेवले पण 'हीच चालू द्यायचं नाही' या हट्टापायी सासू आणि नणंदेने तिच्या मुलीचं नाव बदलून 'गौरी ठेवलं अगदी तसंच दुसऱ्या पोरीचं देखील झालं ऑपरेशन होऊन झालेल्या पोरीचं नाव आता मीच ठेवणार या हट्टापायी विजू ने या गोऱ्यापान पोरीचं नाव 'देवकी' ठेवलं पण पुन्हा तोच प्रकार झाला सासूने आणि नणंदेने या मुलीचं नाव अनुराधा ठेवले.
अशा प्रकारे स्वतःच्या मुलांची नावे ठेवण्याचा अधिकार देखील विजूला नव्हता.
अतिशय बचतीने तिने संसार चालवला. सकाळी पहाटे उठून पोरांच स्वयंपाक करायची. नवऱ्याच्या सगळं हातात द्यायची. सायकलची पंचर काढायला नवरा बसला तर विजू ला हवा मारायला लागायची. हातपाय धुवायला नवरा गेला तर टॉवेल हातात घेऊन उभी रहायची. वेळेवर सगळं करायची नवऱ्यानं मारलं तरी माफ करा पाहिजे तर अजून मारा पण जेवा म्हणून हात जोडायची.
एखाद्या गरीब गाईसारखी गप्प उभी रहायची अनेकदा तिला वाटायचं माहेराला कायमच निघून जावं पण पोरांकडे बघून दिस काढायची. डोक्याने तल्लख आणि ती हुशार होती. पोरांना चांगलं संस्कार देत तीन आपल्या दुःखाला हळू हळू सुखात बदलले.
पोरापेक्षा आपल्या नवऱ्यावर अफाट प्रेम करीत विजू ने वयाची 65 वर्ष आज पूर्ण केली. तिचा संसार आज फळाला आला तिच्या सहनशीलतेचे, संयमाचे बक्षिस तिला देवाने दिले तिच्या डोळ्यासमक्ष तिच्या सगळ्या मुलांचं चांगलं झालं. तिची पोर सरकारी नोकरीला लागली. ती आता बंगल्यात राहू लागली चार चाकी गाडीत फिरू लागली. मोठ्या शहारात राहू लागली.
विजय भगवान जगताप या बाईच्या संघर्षाची हि गोष्ट प्रेरणादाई आहे.
'आई' तुला वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा ..!!
- बिपीन जगताप