'इंडिया टुडे' या प्रसिद्ध मासिकाच्या स्वातंत्रदिन विशेष अंकाच्या मुखपृष्ठावर हिंगोली (सध्या नाशिक) येथील आमचे यशस्वी मधपाळ गजानन भालेराव यांचे चित्र झळकले आहे.
मधमाशी पालन हा शेतीपूरक व्यवसाय नसून तो पूर्ण वेळ उद्योग आहे. गजानन भालेराव या तरुणाने हा पूर्ण वेळ उद्योग करण्याचे ठरविले केवळ दहावीपर्यंत शिक्षण असलेल्या गजाजन यांची घरची परिस्थिती अत्यंत बेताची पण त्यांनी या उद्योगाचे प्रशिक्षण महाबळेश्वर येथील मध संचानालयात घेतले. हे प्रशिक्षण घेत असताना त्यांच्यातील कष्ट आणि जिद्दीची जाणीव होत होती.
मधमाशीपालन निसर्गात राहून करावे लागते. मधमाशांना पूरक असलेला फुलोरा जिथे आहे त्या ठिकाणी त्या घेऊन जाव्या लागतात. मध काढण्याचे शास्त्र पारंगत असावे लागते तरच हा व्यवसाय मोठा होतो आणि त्यासाठी कष्ट करण्याची तयारी लागते. गजानन यांनी हि तयारी करून या व्यवसायात उतरले आहेत.
केवळ दहा मधमाशांच्या पेट्या घेऊन सुरु केलेला त्यांचा उद्योग आज शेकडो पेट्यापर्यंत गेला आहे. ते आपल्या मधपेट्या वसाहती अनेक राज्यात मधुत्पादनासाठी घेऊन जातात त्यासाठी त्यांनी एक टेम्पो देखील खरेदी केला आहे.
अनेकदा अज्ञानापायी त्यांच्या या वाहनाला पोलीस अडवतात मग अनेकदा रात्री त्यांचा फोन येतो 'साहेब पोलिसांना बोला' माझ्या पेट्या अडवल्यात म्हणून सांगतात मग मी पोलिसांना सांगतो "अहो या मधमाश्या आहेत त्यांचा प्रवास रात्रीचा करावा लागतो आणि पिकांसाठी खूप महत्वाच्या आहेत" त्यावेळी मग त्यांना पोलीस सोडतात. अशा अनेक प्रसंगातून त्यांचा मधमाशी पालनाचा प्रवास सुरु आहे. आज दहा वर्षानंतर त्यांची लाखो रुपयांची उलाढाल आहे. अनेक टन मध ते गोळा करतात आपल्या मधमाश्या मार्फत हजारो एकरातील पीक उत्पदनात भरघोस वाढ करतात. गजानन यांनी आता आपला मधाचा ब्रँड केला आहे. त्यातून त्यांनी आपली नवी ओळख निर्माण केली आहे.
आज हजारो तरुण बेरोजगार असताना गजानन भालेराव यांनी मधमाशी पालन करून स्वतःसह आपल्या पत्नीला आणि अनेक तरुणांना रोजगार दिला आहे.
यावेळी मला खूप आनंद होत आहे कि आज राज्यात गजानन सारखे शेकडो तरुण मधमाशी उद्योजक म्हणून मला तयार करता आले. त्यांच्या मार्फत निसर्गाचे संगोपन आणि संवर्धन होत आहे रोजगार निर्मिती होऊन शेतीपिकात भरघोस वाढ होत आहे याचे समाधान मोठे आहे.
'इंडिया टुडे'सारख्या देशातील आघाडीच्या मासिकात गजानन यांचा मुखपृष्ठावरील हा फोटो अनेकांना प्रेरणा देणारा आहे. देशात मधमाशीपालन करणाऱ्या प्रत्येकाचा गौरव करणारा आहे. सिनेमातील चकचकीत चेहऱ्यांच्या अभिनेत्रींपेक्षा गजानन भालेराव यांचा हा फोटो भारी आहे देखणा आहे..!!
गजानन भालेराव तुमचे मनापासून कौतुक आणि अभिनंदन ..!!