Type Here to Get Search Results !

बंडखोर


होय आम्ही आहोत बंडखोर ...!

होय आम्ही आहोत बंडखोर 
लढणार आता आम्ही घनघोर
नेत्यांनी गोड बोलून फसवले 
तिकीट न देता आम्हा रडवले  
अचानक आम्हास कळले 
आमचे तिकीट कापून टाकले 
विरोधकाला गळी मारले 
"प्रचार करा" म्हणून हुकुम सोडले 
एवढेच का आम्ही षंढ होतो ?
का बुद्धीने गंड होतो ?
पुर्षत्वाने का थंड होतो ?
केवढा जनसंपर्क वाढवला 
नको त्याला जवळ केला 
चहा पाणी देऊन कारभारीण कंटाळली 
"यंदा मेम्बर होताय तुम्ही" लाडात म्हणाली
काय सांगू आनंदाची कारंजी फुटली 
ऐन थंडीत अंगावर शिरशिरी उठली 
पण नेत्यांच्या एका आदेशाने स्वप्न तुटून गेले 
डोळ्यातील आसवांना टोकदार भाले फुटले 
नाही आता तुमचा झेंडा घेणार हाती 
नाही आता लावणार तुमचा गुलाल माथी 
ठरलंय फक्त लढणे 
ठरलंय फक्त तुम्हा रडवणे 
सोडला तुमचा आजपासून पक्ष 
होय सध्यातरी आहोत आम्ही अपक्ष 
पाच वर्ष फिल्डिंग लावली 
काही क्षणात तुम्ही मोडली 
शेवटी काय करायचा तुमचा घरोबा 
बरे आहोत आम्ही आपले बंडोबा 
नाही.. आता सहन होत नाही.. 
तुमच्या पक्षातील  अत्याचार 
आमच्या वर केलेले गुपित वार
मागे वळून आता पाहणार नाही 
जिंकून आल्यावर पुन्हा येणार नाही 
पक्ष आणि झेंडा तुमची  निष्टा 
आता कधी ठेवणार नाही 
पुढच्या पंचवार्षिकला 
पक्ष जिवंत राहणार नाही 
म्हणा आम्हाचे खुशाल बंड 
पण आता होणार नाही थंड 
आता गोड बोलू नका 
पैसे आम्हा  दाखवू नका 
रात्री अपरात्री भेटू नका 
बंडाचा झेंडा उतरणार नाही 
निवडणूक आता हरणार नाही 
होय आहोत आम्ही बंडखोर 
जीवाला आता तुमच्या लावतो घोर ....!

-- बिपीन जगताप