पिकलं शिवार .....!
जवारीच्या कणसात सार मोती भरलं
उभ्या पिकामधी कस मन गहिवरलं
माझ्या शेतामधी सार सोन पिकलं !!१!!
शेतामधी माझी साजणी उभी राहते
रानची पाखर गोफणीने दूर ती हाकते
कसे वेड्यावाणी हात पसरे बुजगावणे
पाखरांच्या चोचीने नेले मोत्याचे दाने !!२!!
पाटामंधी पाणी झुळूझुळू वेगे वाहे
सूर्याची कोवळी किरणं डोकावून पाहे
सारी झाली माती ओली चिंब भिजून
जणू नवी नवती नवरी बसली लाजून !!३!!
हरभरा डहाळा गेला पुरा भरून
वाकला शेवगा दिसे शेंगा दुरून
माघाची थंडी कुड्कुडली पाखर
पिकांनी सार कस शिवार झाकलं !!४!!
रानच्या रे देवा मनी आहे माझ्या आस
माझ्या शेतात पिकते धान्याची रे रास
यंदा पडू दे पदरात मुबलक पिकं पाणी
गावाच्या पंडिताची खरी होऊ दे वाणी ...!!५!!
-- बिपीन जगताप
Social Plugin