Type Here to Get Search Results !

अग्नीपंखाच्या...छायेखाली




भारतरत्न  ऐ.पी.जे.अब्दुल कलाम यांचा दौरा 

सळसळता  उत्साह...चेहऱ्यावरील निखळ हास्य....चालण्याची तडफ....बोलण्याची लकब....सगळंच आश्चर्य  करायला लावणार....शाळेतील लहानग्यांच्या हातात हात देत जाणारे कलाम आजोबा सगळ्यांना मोहित करून जात होते....भारतरत्न ..भारताचे माजी राष्ट्रपती ऐ.पी.जे.अब्दुल कलाम नुकतेच दोन दिवस सोलापूर दौऱ्यावर आले होते.



प्रचंड आत्मविश्वासाने केलेल्या आपल्या कामाने आणि देश प्रेमाने साऱ्या जगाला अचंबित करायला लावणारे डॉ. कलाम यांना पाहताना जीवन सार्थक झाल्याची भावना लहाना पासून थोरापर्यंत होती. निसर्ग, विज्ञान, समाजकारण, माहिती तंत्रज्ञान, अश्या अनेक विषयांनी परिपूर्ण असणारे हे व्यक्तिमत्व सगळ्यांना भारावून टाकते याचा अनुभव मी याची देही याची डोळा घेतला. 
सोलापूर मधील सुयश गुरुकुलातील लहानग्यांना प्रेमाने जवळ घेताना या महामानवातील प्रेमळ आजोबा दिसले. तर स्मृतीवनातील झाडांची पाहणी करताना थोर पर्यावरणतज्ञ दिसले. आज पर्यंत असे पाहण्यात येते कि अनेक मोठ्या पदावरील मान्यवरांना प्रश्न विचारण्यास लोक धजावत नाहीत पण कलाम साहेबांना अनेक लहानगे तसेच तरुण सहज प्रश्न विचारत होते आणि  तेवढीच सुंदर उत्तरे त्यांना मिळत होती.
" प्रचंड आत्मविश्वास उरी बाळगला तर यश हातात येते पण त्यासाठी नियोजन करून कष्ट करण्याची तयारी असावी लागते. असे यशाचे सूत्र सांगत तुम्ही संशोधक व्हा असा मौल्यवान सल्ला तरुणांना दिला. 
प्रत्येक भारतीयाने जाती धर्मापेक्षा आपल्या ह्रदयात तिरंगा फडकवावा...देशाला जगात अव्वल करावयाचे असल्याने तरुणांनी आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर देश हिताला प्राधान्य देणे आवश्यक आहे. माझे विज्ञानाचे शिक्षक हेच माझ्यासाठी प्रेरणा स्थान आहेत. कारण आभाळात मुक्त विहार करणाऱ्या पक्षाप्रमाणे मला त्यांनी विज्ञानाच्या दुनियेत भरारी घेण्यास शिकवले" असे नम्रपणे डॉ. कलाम यांनी सांगितले.
या देशाच्या अतिउच्च पदावर राहिलेले आणि संपूर्ण भारत वासीयांच्या मध्ये प्रेरणा देणारे डॉ.कलाम देशातील एक थोर व्यक्तिमत्व आहे अशा व्यक्तीला पाहण्याचा आणि ऐकण्याचा योग सोलापूरकरांना आला. अनेक शाळकरी मुल महाविद्यालयीन तरुण तरुणी आणि शिक्षक यांच्यासाठी हि पर्वणी होती. 
अनेक शिक्षकांना माजी राष्ट्रपतींनी मुलांवर प्रेम करा...त्यांना संशोधक करा..त्यांच्यातील नवनिर्मिती करण्याच्या धाडसाला थांबवू नका. शाळा हि उर्जाकेंद्रे बनली पाहिजेत त्यासाठी या देशातील शिक्षकांनी प्रयत्न करणे महत्वाचे आहे.असे सांगत समाजाला मुल्ये देण्याचे काम जीवनभर करा असा आशीर्वाद दिला. 
कलाम साहेब यांचा साधा निरागस चेहरा पण आजही वयाच्या ८० व्या वर्षी असणारा उत्साह खूप प्रेरानादाई आहे. अनेक तरुण ऐन तारुण्यात नैराश्याने ग्रासलेल्या असताना डॉ. कलाम यांनी जागवलेला हा उत्साह, विश्वास देशाला २०२० साली नक्की महासत्ता बनवेल असा विश्वास वाटतो.  

-- बिपीन जगताप