Type Here to Get Search Results !

उन्ह लागली तापू ..!
















उन्ह लागली तापू ..! 


उन्ह लागली तापू 
पिक लागली करपू 
सूर्याची किरण 
लागली आग ओकू   !!१!!

गर्द सावली दिसेना लांब 
उन्हाची झळ, सोसेना थांब  
अंगाची लाही सुरु झाली बाई
घामाच्या धारा अखंड वाही  !!२!!

गुरांचा चारा ,उन्हाचा मारा 
गरम झळा ,वाहतो वारा 
सुगी झाली ,पडली ताट 
थंडगार पाण्याने भरले माठ !!३!!

'यंदा भारी उन्हाळा दिसतो '
झाडाखालचा म्हातारा म्हणतो 
चिंचा आंबे कलिंगड येईल 
पाण्याने पोट भरून जाईल  !!४ !!

झाली सुट्टी, सुटली शाळा 
दिवसभर आता 'गप्प रे बाळा'
सगळा गाव दिवसा झोपतो 
रात्री गप्पांचा फड रंगवतो  !!५!!

यात्रा, जत्रा रंग भरतील 
लांबची माणस घरी जमतील 
आपली घरे भरून जातील 
मायेचे आता पूर येतील  !!६!!

-- बिपीन जगताप