Type Here to Get Search Results !

गुढी पाडवा...!

 गुढी पाडवा...! मराठी नूतन वर्ष...!



निसर्ग संवर्धनाचा संकल्प 

झाडे निष्पर्ण झाली...उष्ण वारा वाहू लागला.., थंडीचा कडाका संपला..आणि चैत्राची हिरवी पालवी फुटली. धरणी मातेच्या आनंदाला उधान आले. उंच उंच गुढी उभी राहिली. कोवळ्या लिंबाची पाने वाऱ्यावर डोलू लागली.
सगळीकडचे सुगीचे दिवस संपले, सणवाराला मंडळी घरी जमली, आणि आनंदाची चैतन्याची गुढी उभी राहिली. गुढी पाडवा मराठी नववर्षाची सुरुवात....चैत्र महिना..पुढे येणाऱ्या  वैशाख वणव्याची चाहूल करून देणारा. 
अशा चैत्रातील हा सण मराठी माणसांसाठी फार महत्वाचा सण मानला जातो. 
श्री राम जेव्हा रावणाचा वध करून आयोध्येला परतले तो दिवस गुढी पाडवा म्हणून साजरा करण्याची परंपरा आहे. रामाचे स्वागत करण्यासाठी आयोध्यावासियांनी गुढ्या तोरणे बांधली. लोकांच्या आनंदाला उधान आणणारा हा सण आहे. भारतीय सण निसर्ग आणि माणूस एकरूप करण्याचे काम करतात. निसर्गाला जवळ घेण्याची , त्याचा कुशीत विसावण्याची हि परंपरा आहे.  निसर्ग आणि माणूस यांचा स्नेहमेळावा म्हणजे गुढी पाडवा...!
 पण आपण सध्या बघत आहोत मोठ्या प्रमाणात पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. दिवसेंदिवस होणारी वृक्ष तोड आपल्या साठी धोकादायक बनत आहे. निसर्गाची शुध्द हवा,पाणी आपण मोठ्या प्रमाणात प्रदूषित करत आहोत. मराठी सण हे निसर्गाच्या जवळ घेऊन जाणारे सण आहेत. आज गुढी पाडव्याला आपण कडू लिंबाचा मोहोर आणि गुळ खातो, आंब्यांच्या डहाळी तोरण बांधण्यासाठी वापरतो . निर्जीव घराच्या दाराला या आंब्याच्या पानामुळे सौंदर्य येते. घराची शोभा वाढते. माणूस आणि निसर्ग वेगेळे नाहीत. निसर्गाचे संवर्धन करत आपला आनंद साजरा केला तर निसर्ग आणि आपण एकरूप होऊन जाऊ.
संपूर्ण जग आपल्या मुळे कदाचित बदलणार नाही ..पण एक झाड लावल्यामुळे निसर्गाचे केलेले संवर्धन जग बदलवण्याच्या प्रयत्नातील महत्वाचे पाऊल ठरू  शकेल असा मला विश्वास आहे.  
आज मराठी नववर्षाच्या निम्मिताने आपण झाडे लावून ती जागवण्याचा संकल्प करणे महत्वाचे आहे. जागतिक तापमान वाढ झालेली असताना. मोठ्या प्रमाणात जाणवणाऱ्या दुष्काळाच्या झळा, गावागावात होणारी पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई.. गुरांच्या चाऱ्याचे प्रश्न भीषण होत आहेत. उन्हाळ्यात पाणी शोधून सापडत नाही. हिरवागार आणि पाण्याने संपन्न असणारा आपला मुलुख आपण उजाड केला आहे. यासाठी हे सण साजरे करताना फक्त आपल्या आनंदाचा विचार न करता आपल्या बरोबर निसर्ग आणि पशु पक्षी यांचाही विचार होणे आपल्याच  फायद्याचे आहे. आज नव वर्षाची गुढी उभी करताना निसर्ग संवर्धन करण्याचा संकल्प मी करत आहे. निसर्ग जतन करण्यासाठी माझे काही मित्र हि प्रामाणिक प्रयत्न करत आहेत. त्यांना खूप खूप शुभेच्छा...!
मराठी नववर्ष आनंदाचे सुखाचे आणि निसर्ग संवर्धन करण्याच्या संकल्पनेत जावो या मनपूर्वक शुभेच्छा ...!

-- बिपीन जगताप