उन्हाळा आला .......!
निसर्ग माणसाला किती जपतो. माणसावर अतोनात प्रेम करणारा निसर्ग संपवणे माणसाच्या जातीसाठी धोकादायक ठरू शकते. भर उन्हाळ्यात गर्द सावली देणारी झाडे , तहानेने व्याकूळ झालेले असताना संथ वाहणारी नदी , आणि प्रचंड पाण्याने भरगच्च असलेली फळे निसर्ग उदार हाताने माणसाला देत राहतो . पण निसर्गाचे चक्र आपण जाणीवपूर्वक बिघडवत आहोत. यासाठी काही नियोजन करून पर्यावरण जतनासाठी काम करावे लागणार आहे. पुढच्या पिढीला पर्यावरणाचा निसर्गाचा वारसा जतन करून ठेवायचा असेल तर डोक्यावरील उन्हाचा पार थोडा कमी करायचा असेल तर झाडे लावणे आपल्या हिताचे होणार आहे. निसाराची संपत्ती असणारे किती तरी गोष्टी लुप्त पावत आहेत. ताण तणावाचे जीवन जगात असताना निसर्गाच्या कुशीत विसावले कि माणसाला फार मोकळे शांत वाटते. आज निसर्ग आपल्यापासून दूर जात आहे. निसर्गाला घरापासून लांब शोधात जाण्यापेक्षा आपल्या घराजवळ सुंदर वृक्ष वेली लावा. सुंदर आकर्षक फुलांनी आपले घर सजवा. प्रत्येकाला उन्हाळ्याच्या दिवसात आपल्या घरी यावेसे वाटेल असे घर गर्द सावलीने घर थंड करा. यासाठी फार काही करावे लागणार नाही . येणाऱ्या पावसाळ्यात खूप झाडे लावा. ती जगवा आणि आपला परिसर हिरवा करण्याचे स्वप्न साकार करा. मग बघा पुढच्या वर्षीचा उन्हाळा तुम्हाला अलाहाद दायक वाटल्याशिवाय राहणार नाही . अनेक गावे आज झाडे नसल्याने खूप भकास वाटत आहेत. शहरातील लोक खूप वर्षापासून उन्हाळ्यात आपल्या घरी जात. त्यावेळी घराच्या अंगणात बसून मारलेल्या गप्पा , पहाटे वाजणारी थंडी, दिवसभर आंब्याच्या गर्द सावलीत चाललेला सूर पारंब्या चा खेळ, नदीच्या वाहत्या पाण्यात मारलेले सूर, अशा उन्हाळ्याचे दिवस साजऱ्या करणाऱ्या मंडळींना मागील दहा वीस वर्षापूर्वीचा उन्हाळा उगाच हूर हूर लावून जातो आहे.
यंदाही उन्हाळा आला आहे पण थोडे जास्तीचे तापमान घेऊन. सूर्यदेव त्याची वनराई नष्ट करणाऱ्या माणसावर रागवला आहे. त्याचा रागाच्या झळा खूप असह्याय झालेल्या आहेत. पण निसर्गाचे माणूस एक सुंदर लाडके लेकरू आहे. त्यामुळे यंदा पुन्हा सूर्यदेव आपल्याला संधी देईल येणाऱ्या पावसाळ्यात खूप झाडे लावून पुढील वर्षी सूर्य देवांना रागवण्याची संधी द्यायची नाही असा संकल्प आपण सर्वांनी केला पाहिजे. निसर्गाचे सगळे ऋतू आपल्यासाठी आनंदाचे सोहळे झाले पाहिजेत यासाठी आपण निसर्गाचे संवर्धन आणि संरक्षण करणे आवश्यक आहे.
-- बिपीन जगताप
Social Plugin