Type Here to Get Search Results !

महामानवाला वंदन


भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेड...!!

भारतासारख्या एका महाकाय देशाची राज्यघटना लिहिणारे...... अस्पृश्य समाजात जन्माला आलेले आणि आपल्या विद्वत्तेने संपूर्ण जग जिंकणारे..........समाज आणि देशहित  नजरेसमोर ठेऊन जीवनभर कार्यरत राहणारे ........गुलामाला गुलामीची जाणीव करून दिली कि तो बंड करून उठेल असे  सांगत संपूर्ण समाजाच्या धमन्यांमध्ये सळसळते रक्त भरणारे .................पुस्तकांवर अफाट प्रेम करत ...जीवनभर ज्ञान सागरात पोहणारे  महान तपस्वी....भारतरत्न  डॉ. भीमराव रामजी आंबेडकर..!
  डॉ. आंबेडकरांची आज जयंती साजरी करत असताना या महामानवाच्या कार्याची उजळणी अपोआप होते. एखादा महत्वाचा सामाजिक प्रश्न घेऊन भारतातील अनेक महा पुरुषांनी क्रांती केली आहे. चारशे वर्षाची गुलामगिरी  संपवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले स्वतंत्र मराठी राज्य उभे केले. छत्रपती शिवाजी महाराजांची लढाई धर्माची नव्हती तर अन्यायाविरुध्द होती. तसेच जाती पती, धर्म पंथ या बाबीमध्ये अडकलेल्या समाजाला सत्यशोधक नजरेने सत्याचा शोध घेण्यास महात्मा ज्योतिबा फुले यांनी प्रवृत्त केले. त्यांचाच वारसा पुढे नेण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर जीवनभर कार्यरत राहिले. महात्मा फुले १८९० मध्ये कालवश झाले आणि डॉ.आंबेडकर १४ एप्रिल  १८९१ मध्ये जन्माला आले. या दोन तारखा नीट  तपासल्या तर आपल्या लक्षात येईल महात्मा फुले यांचे पुढील कार्य पूर्णत्वाला नेण्यासाठीच आंबेडकरांचा जन्म झाला आहे. आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी हे सिध्द केले आहे.  
जगाला शांतीचा मार्ग दाखवणाऱ्या गौतम बुद्धांच्या प्रज्ञा, शील, करुणा, या विचारांनी वाटचाल करत बाबासाहेबांनी समाजात क्रांती केली. पशुपेक्षा हीन दिन वागणूक माणसाला माणूस देत होता आणि ती मुकाटपणे सहनही माणूस करत होता. अशा काळात समाजात अंधार असताना. शिक्षणासारखे दुधारी अस्त्र बाबासाहेबांनी हस्तगत केले. घरची गरिबी असल्याने रस्त्यावरच्या दिव्याखाली आपली ज्ञान तृष्णा भागवत अखंड ज्ञानाचा संकलन बाबासाहेबांनी केले. माणूस शिकला तरच तो प्रगती करू शकेल. असे सांगत त्यांनी समाजाला अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या उजेडात आणले. अन्याय आणि गुलामी याची सवय माणसाला लागली कि त्याला स्वातंत्र दिसत नाही. त्या प्रमाणे हजारो वर्षाच्या गुलामीत जगलेल्या माणसामध्ये तू माणूस आहे. याची जाणीव करून दिली.  माणसाला बळकट करून संपूर्ण समाजात क्रांतीची मशाल पेटवणे हे अत्यंत अवघड काम बाबासाहेबांनी केले. देशावर प्रेम करणारे आणि जाती धर्मापेक्षा माझा देश मोठा आहे असे सांगणारे बाबासाहेब मोठे देशभक्त होते. म्हणूनच सर्व समावेशक अशी राज्यघटना त्यांनी या देशातील माणसाला अर्पण केली आहे. जगातील अनेक विध्यापिठांच्या पदव्या घेत त्यांनी जीवनभर शिक्षण घेतले. समाजातील प्रत्येक माणूस एक ज्यालामुखी आहे.  शिक्षणाने अशा माणसात आत्मविश्वास निर्माण करण्याचे महान कार्य बाबासाहेब आंबेडकर यांनी केले.
आज त्यांची जयंती साजरी करत असताना एक महान अभ्यासकाचे काही गुण आपल्या अंगी आणणे महत्वाचे ठरेल. १८ तास अभ्यास करून पुस्तकावर अखंड प्रेम करणारा हा महापुरुष आपल्या सगळ्यांना अनुकरणीय आहे. त्यांच्या जयंती निम्मित माझ्या हार्दिक शुभेच्छा...!
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन...!














 महामानवाला वंदन 

जीवनभर फक्त सेवा समाजबांधवांची
मानवतेच्या खऱ्या समाजसेवकाची !

अभ्यास आणि ज्ञान मिळवत जीवन जगले 
समाजाच्या सोशिकतेने मनातून हळहळले !

देश आणि समाज हाच माझा धर्म 
झुगारून दिले परंपरेचे थोतांडी कर्म !

जीवनभर ध्यास गुलामी नष्ट करण्याचा 
माणसाच्या खांद्यावरील जू फेकून देण्याचा !

शिकवण फक्त दिली साऱ्यांना मानवतेची 
माणसाला  माणूस करून घेण्याची !

माणसातील महामानवाने मानवता रुजवली 
प्रज्ञा, शील करुणा माणसाला शिकवली !

बाबासाहेबांच्या विचारांनी क्रांती केली आहे 
आभाळात झेपावण्याचे बळ पंखात भरले आहे !

महामानवाला आज वंदन सारे करू यात 
जीवनातील अंधाराला दूर फेकून देऊ यात !

--- बिपीन जगताप