झळा दुष्काळाच्या .....!
पोटासाठी उभा असा आम्ही जन्म जाळतो
कसा आमच्या नशिबी तुझा खेळ हा देवा
कडक उन्हात गेली करपून अमुची काया...!
डोक्यावरील सूर्य का रे असा आहे कोपलेला
माझ्या नशिबाचा थेंब कसा कुठे रे लपलेला
दिन रात फिरतोया घसा ओला कराया
शोध घेत राहतो माझा जीव जगवाया........!
झाड वेली सुखलेल्या पाणी गेलया रे खोल
कसा मिळेना उतारा जीव आहे अनमोल
दारातील जनावरे केविलवाणी पाहतात
नाही हाती चारा पाणी हंबरून मरतात.....!
आई, लेकरू जाते पाणी शोधाया दूरवर
नाही पोटात भाकर कसा देव झोपलाय वर
कसा आमचाच जन्म झाला दुष्काळ देशा
काळ्या आईच्या अंगावर भेगाळल्या रेषा ....!
नाही देवा नाही देत तुला रे आम्ही दोष
नको काढू रे बाप्पा आमच्यावर तू रोष
पडू दे रे माझ्या थोड अंगणात पाणी
गाईन जन्मभर देवा तुझीच रे गाणी ....!
- बिपीन जगताप
Social Plugin