प्रेम असे कसे ..!
जगात सुंदर मनाची ह्रदयाची माणसे अजून तरी आहेत यावर विश्वास बसायला लागतो. एखाद्या अपरिचित माणसाबद्दल मग जिव्हाळा उत्पन्न कसा होतो हे मनाला उमगत नाही. मग त्या अपरीचीताबद्दल उगाच आपल्याला हूर हूर वाटू लागते. असे प्रेम माणसाबद्दल निर्माण झाले तरी काही बंधने पाळावी लागतात. सहज सहजी सगळे जमून येईल असे सांगता येत नाही. एखादा जिवलग जीवनाच्या वाटेवर कुठे तरी भेटावा असे मात्र मग मनापासून वाटते.
निस्वार्थ भावाने प्रेम करणारी माणस तशी विरळच...!. पण असतात यावर मात्र विश्वास ठेवावा लागतो. सगळे जग फसवे आहे. सगळे कोणत्या न कोणत्या स्वार्थाने आपल्याकडे येतात असा सतत विचार करू नये. मनाची पारदर्शकता आणि ह्रदयाची निर्मळता असेल तर माणसात परिवर्तन होऊ शकते. प्रेमाने जग जिंकता येते यावर विश्वास ठेवणे मात्र अपरिहार्य आहे. जगातील कोणत्याही ठिकाणी गेले तरी माणसाच्या भावना प्रेम एकच असते. कदाचित देश, वेश, भाषा,प्रांत, जात,धर्म, स्त्री ,पुरुष असे भेद असू शकतील पण ह्र्दय मात्र एक असेल. त्यातील प्रेम सारखेच असेल. आपण अनेकदा माणसांच्या स्वभावाच्या चर्चा करतो . आपल्या मनाला भावणाऱ्या स्वभावाच्या माणसाशी मैत्री करतो. पण ईश्वराने निर्माण केलेल्या प्रत्येक माणसाला एक स्वतंत्र व्यक्तीमत्व आहे. या जगात जन्माला येणारा प्रत्येक जीव आपले अस्तित्व दाखवतो. मग आपल्याला वाटत राहते सगळी माणस चांगल्या स्वभावाची पाहिजेत. आपली इच्छा अशी असणे चुकीचे नाही. पण प्रतेकाच्यात विविधता असेल तर असा हट्ट असणे हे पण चुकीचेच म्हणता येईल. आपल्याला सगळ्यांशी मैत्री कदाचित करता येणार नाही. पण आपल्याला सगळ्याबद्दल निरवैर मात्र सहज होता येईल. कोणाबद्दल वैरत्व न ठेवले कि आपण सगळ्या बद्दल प्रेम आत्मीयता ठेवू असा याचा अर्थ होतो.
जीवन असेच पुढे जात राहणार आहे. या प्रवासात अनेक भेटतात प्रत्येकाचा आपल्या पासून सूर जाण्याचा टप्पा येतो. मग मात्र आपण थोडे भावना विवश होतो कारण दोन्ही शरीरे वेगळी असली तरी ह्र्दय एकंच असतात. अनेकदा आपल्या बरोबर ३० वर्ष काम करणारी माणस आपली होत नाहीत. ज्याच्या बरोबर लग्न झाली ती सुद्धा ह्रदयात बसत नाहीत. पण अनेकदा अनोळखी असणारी अपरिचित वाटणारी आपली कशी होतात हा देवालाही न समजणारा प्रश्न आहे.
जीवनात यशस्वी होण्यासाठी मात्र आपल्याला या माणसांची खुपदा मदत मिळते. कधी कधी माणसाला मन साथ देत नाही त्यावेळी ह्रदयाच्या कुपीत ठेवलेली हि माणस आतून प्रेरणा आणि मार्गदर्शन करतात. आणि जीवनाचा सोहळा सुखाचा होऊन जातो. मात्र यासाठी अखंड प्रेम आणि आनंद देत जगले पाहिजे.
- बिपीन जगताप
Social Plugin