Type Here to Get Search Results !

भारतीय


भारत माझा देश आहे. 


"भारत माझा देश आहे.
सारे भारतीय माझे बांधव आहेत
माझ्या देशावर माझे प्रेम आहे ."

अशी प्रार्थना मी शाळेत असताना दररोज म्हणायाचो. शाळेतील वातावरणात याचा अर्थ मी कधी शोधला नाही आणि गुरुजींनी तो कधी सांगितला नाही. शाळेत अशी प्रार्थना आजही म्हटली जाते.  १५ ऑगष्ट आणि २६ जानेवारी हे दोन दिवस  मला खूप आनंदाचे वाटायचे. भल्या पहाटे उठून  आम्ही शाळेची वाट धरायचो. कागदी तिरंगा खिशाला लावून आणि हातात धरून आम्ही जोमाने शाळेत पोह्चायचो, मग सगळ्या गावातून  देशाच्या महापुरुषांच्या घोषणा देत प्रभात फेरी निघायची. आम्हा मावळ्यांच्या छात्या अभिमानाने भरून यायच्या ( देश प्रेमाने नव्हे गावातील घरातील लोक आमच्याकडे कौतुकाने पाहताहेत म्हणून ) काही वेळाने  प्रभात फेरी शाळेच्या प्रांगणात पोहचली कि मग कवायत सुरु होत असे. मग मुलांची भाषणे  ( आई वडिलांनी कधी गुरुजींनी ) लिहिलेली सुरु होत. त्यावेळी देखील त्यामध्ये अनेकदा भारत देश आणि मातृभूमीचा उल्लेख सतत होत असे. नंतर गावातील सरपंच आणि प्रतिष्टीत लोक भाषणे करत ते देखील भारत देशावरील प्रेमाबद्दल बोलत आणि मग खाऊ ( पार्ले बिस्कीट ) देऊन कार्यक्रम संपत असे. मला आजही हे दिवस अगदी जसेच्या तसे आठवतात पण हे दिवस परत कधीच येणार नाहीत याची हूर हूर पण लागते.
आज मी मागील दिवसांचा विचार करतो पण  मला आजही नीटसे समजत नाही. शाळेत असताना मी भारत देशाची प्रार्थना किमान लाख वेळा म्हटली असेल पण ते शब्द उच्चारणे या पलीकडे मी काही केले नाही, त्या प्रार्थनेत असणाऱ्या शब्दांच्या  अर्थाचा शोध मी कधी घेतला नाही. किंवा कोणी सांगितला नाही. कारण  आजही मला माझ्या शेजारी राहणारे माझे बांधव का वाटत नाहीत..? आजही मी माझा विचार करतो. नंतर माझ्या कुटुंबाचा समाजाचा, जातीचा धर्माचा  आणि फार पुढे गेलो तर माझ्या भाषेवर माझ्या प्रांतावर प्रेम करतो पण मग भारत देशाची प्रार्थना मी का म्हटली असेल ?  त्या प्रार्थनेचा संस्कार माझ्यावर का झाला नाही? असे प्रश्न मला आता सतत पडतात.
कदाचित याची करणे माझ्या अल्प बुद्धीप्रमाने अशी असू शकतील. १) मी लहान असताना घरात मला देश, देश बांधव  कधी शिकवले  नाही २) वर्गात माझ्यावर गुरुजींनी जे संस्कार करणे आवश्यक होते ते कधी केलेच  नाहीत. ३) मला महापुरुषांचा इतिहास हा फक्त परीक्षेत किती मार्कला येतो  हे शिकवले पण आंदोलन म्हणजे काय आणि ते कसे केले जाते हे कधी सांगितले नाही .४) भारत देश हा सर्वात अगोदर आणि नंतर सगळे असे कोणी प्रभावीपणे सांगितले नाही. ५) बंधुत्व भाव संवेदनशीलता याचा कधी अनुभव घेता आला नाही. ६) भारत  देश आहे आणि त्याचा सण १५ आणि २६ या दोन तारखांना येतो याची फक्त सरकारने सांगितले म्हणून साजरे करायचे हेच माझ्या मनावर ठसवले गेले ७)  जातीचा धर्माचे प्रेम आपला जातवाला महापुरुष  हेच  सर्वश्रेष्ठ आहे हे विसरू नको हेच माझ्या ह्रदयावर कोरले गेले   १०) आणि सर्वात शेवटी अजूनही मी माझ्या देशाचा खरा शोध घेत नाही त्यामुळे त्याच्यावर प्रेम करत नाही.
वरील दोन्ही बाजू विचारात घेतल्या कि आपल्या लक्षात येईल आपण सगळेजण कुठे तरी कमी पडत आहोत.  भारत माझा देश आहे आणि हा देश फक्त प्रार्थने पुरता  संकुचित झाला आहे. कारण मोठ्या प्रमाणात  होणारया जातीय दंगली,  एकमेकांच्या भांडणात होणारे खून मारामाऱ्या, स्त्रियांवर होणारे अत्याचार,  भाषिक आणि उफाळून येणारा प्रांतवाद, प्रत्येकाने नव्याने सुरु केलेला जातीयवाद , हे सर्व पाहता आजही आपणाला देश समजू शकला नाही. आजही आपण देश बांधवावर प्रेम करू शकत नाही असे खेदाने म्हणावेसे वाटते. या पेक्षा भयंकर म्हणजे आपली नवी पिढी जे देशाचे भविष्य आहे ते  सध्या महाविद्यालयात  जातीच्या आणि प्रांताच्या नावाने होणाऱ्या संघटना सुरु करत आहेत. म्हणून आपल्याला देशाची प्रार्थना त्यातील शब्द ह्रदयात मनात ठसवले पाहिजेत त्याचे संस्कार मुलांच्या बालमनावर केले पाहिजेत. तर आणि तरच खऱ्या अर्थाने आपला देश सुजलाम सुफलाम होईल.  म्हणूनच या सगळ्यांचा विचार केला तर देश प्रार्थना मी लाख वेळा म्हटली ती सगळी वाया गेली असेच म्हणावे लागेल ना...!

एका कवीचे छान शब्द आहेत 
"हा देश माझा याचे भान जरासे राहू द्या रे 
जरी अनेक अपुले धर्म जरी अनेक आपुल्या जाती !
परी अभंग असू द्या सैदैव आपुली माणुसकीची नाती !
द्या सर्व दूर ललकारी फुंका रे एक तुतारी !
संदेह रोष जो द्वेष मनातील वाहून जाऊ द्या रे !
हा देश माझा याचे भान जरासे राहू द्या रे ..!"

या कवितेतील प्रत्येक शब्द ह्रदयात जपून ठेवावा असाच आहे. जगात मायभूमी आणि देश याशिवाय कोणतीही गोष्ट  महत्वाची नाही. ज्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी  या भूमीच्या  हजारो पुत्रांनी  आपल्या जीवाची बाजी लावली. त्या सगळ्याला खरी श्रद्धांजली वाहायची असेल तर आज माझा देश आणि माझे देश बांधव यांच्यावर मनस्वी प्रेम करता आले पाहिजे. आज खूप वर्षांनी मला हे समजले कि मी, माझे कुटुंब, जात धर्म या पेक्षा माझा भारत देश आणि भारतीय हे सर्वात प्रथम आहेत. हे समजण्यासाठी कदाचित  मला काही  कालावधी गेला असेल  पण हेच जर मला माझ्या गुरुजींनी लहानपणी माझ्या मनावर ठसवले असते  किंवा माझ्या कुटुंबाने मला याची जाणीव करून दिली असती मला खूप आनंद झाला असता. पण असो आजही मला माझ्या देशाच्या प्रार्थनेचा अर्थ कळला आणि माझा देश माझा देव आहे हे समजले तरी खूप आहे. आपणला ही  तो कळवा आणि आपल्या लहानग्याला तो समजवावा अशा मी मनापासून इच्छा व्यक्त करतो .. आपणाला स्वतंत्र दिनाच्या खूप शुभेच्छा देतो. 
- बिपीन जगताप