हा देश माझा ….!
भारत देशाचा ६६ वा स्वातंत्रदिन उद्या आपण साजरा करत आहोत. भारत देश इंग्रजांच्या गुलाम गीरीतून मुक्त व्होवा यासाठी अनेक देशभक्तांनी आपल्या देहाचे बलिदान देऊन हा देश गुलामगिरीतून मुक्त केला याचे स्मरण आणि भविष्यातील देशासमोरील आव्हाने यांची आठवण म्हणून उद्याचा दिवस आपण साजरा करीत आहोत.
भारत देश त्यातील विविधता हि जगासाठी आश्चर्य ठरणारी बाब आहे. देश सेवा , समाजसेवा या त्यागावर आधारलेल्या आहेत. आज समाजात अनेक लोक आपल्या चांगल्या कामाने देशाचे नाव उज्ज्वल करत आहेत. काही ठराविक लोक चुकीचे वागून देशाला बदनाम करतात पण लाखो लोक चांगले वागून देश पुढे नेतात. आणि आशा चांगल्या लोकांच्यात आपण सहभागी असणे महत्वाचे आहे.
देश हा लोकांनी निर्माण होतो. लोक जर देशहिताचे काम करत असतील तर दुसऱ्या देशाचे लोक डोळे वर करून आपल्याकडे पाहण्याचे धाडस करणार नहित. सीमेवर सैनिक आपले बलिदान देऊन या देशाचे संरक्षण करत आहेत. येथील लोकांना सुरक्षितता मिळावी म्हणून पोलिस आपल्या दारावर रात्रदिन पहारा देत आहेत. सर्वांसाठी सण असतात पण सैनिक आणि पोलीसासाठी लोकसेवा हाच सण असतो. देशवासीयांच्या चेहऱ्यावरील उस्ताह आनंद हाच यांच्यासाठी स्वर्ग ठरतो.
आज आपण देशाचा सण साजरा करताना आपल्या समाजात आपल्यामुळे दुही निर्माण होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. जातीयवाद, भ्रष्टाचार, स्त्री भ्रूण हत्या, कुपोषण, गरिबी, प्रांतवाद, भाषावाद, हे सर्व आव्हाने आज देशासमोर उभे आहेत. यांचा निपटारा करून देश प्रगतीपथावर नेणे आपल्या सर्वांच्या समोर असणारे एक मोठे आव्हान आहे. पण देशातील तरुणांवर माझा विश्वास आहे. या देशात अनेक महापुरुष जन्मले आहेत ज्यांनी आम्हा तरुणांना त्याग शिकवला आहे. नेताजी सुभाष चंद्र बोस यांनी आठ महिन्यात आय. सी. एस . परीक्षा पास होऊन देखील पदाचा राजीनामा दिला आणि भारत मातेच्या सेवेत आपले जीवन घलवले. बाबासाहेब आंबेडकर यांनी जीवनात अठरा पदव्या घेतल्या आणि संपूर्ण जीवन दिन दलितांच्या सेवेत घालवले.
महात्मा गांधी यांनी मिठाचा सत्याग्रह करत या देशातील जनशक्ती जगाला दाखवून दिली. अनेक महा पुरुषांनी आपल्या जीवाचे बलिदान देऊन हा देश अनेक संकटातून मुक्त केला आहे. आज देश स्वतंत्र आहे. पण देशासमोरील आव्हाने संकटे वाढत आहेत आपल्याला एकोप्याने पुन्हा उभे राहावे लागेल. जात धर्म प्रांत भाषा विसरून भारतीय म्हणून जगाच्या समोर जाताना हा देश माझा आहे या भावनेतून काम करावे लागेल. मला विश्वास आहे आपण या विश्वातील महान शक्ती म्हणून उदयास येऊ.
तरुणांमध्ये राष्ट्रप्रेम आणि देशभक्ती निर्माण करू शकू. आपण एक आहोत एक राहू……।!
जय हिंद …. भारत माता कि जय …!
-- बिपीन जगताप
bipinjagtap14@gmail.com