Type Here to Get Search Results !

भिवाई देवीची जत्रा



गुढीपाडव्याच्या गुढ्या उतरल्या की महाराष्ट्राच्या गावागावात सुरु होतात यात्रा जत्रा ...!
अंगाची लाही लाही करणारा उन्हाळा नकोसा वाटतो पण जशी उन्ह तापु लागतात तशी गावाकडची मंडळी बाभळीच्या वडाच्या झाडाच्या सावलीखाली बसली की यात्रा जत्रेच्या चर्चा रंगात येतात.
आमच्या गावाची जत्रा पण तशीच चैत्र पोर्णीमेच्या दुसऱ्या दिवशी येणारी. नदीकाठी असलेले कांबळेश्वर हे टिपीकल गाव...गावाच्या दक्षिणेला वाहणारी निरा नदी ..नदीकाठी दोन्ही तिरावर घुमटा सारखं दिसणारं भिवाई देवीच मंदीर अनेक लोकांच श्रद्धास्थान आहे.....!
आमच्या लहानपणी भिवाईची जत्रा आम्हाला फारच अप्रुप आसायची. दोन तीन दिवस चालणारी ही जत्रा मनात आजही घर करुन आहे.
जत्रेला आठ दिवस असताना सगळी शेणामातीची घर सारवली जायची. घराघरातल्या गोधड्या धुण्याची लगबग सगळ्या नदीवर असायची. तहान भुक हरवून जायाची . घरोघरच्या भिंतीना मातीन सारवलेले असल्याने घरात पहिल्या पावसाचा सुंगध असायचा.
जत्रा आता अगदी गावाच्या वेशीपर्यंत आल्याचा सांगावा हा घरातला वास मनाला सांगायचा.जत्रेची वातावरण निर्मीती होत असे. सगंळ गाव नव्या नवरीगत नटायचं...!
वर्षभर गावाला न येणाऱ्या भुमीपुत्रांनाही या जत्रेची आंतरीक ओढ असायची. प्रत्येकाच्या घरात पाहुणे रावळी यायची. पुण्या मुंबईकडे असणारे सगळे या जत्रेला यायचे. नवी कपडे ...नवी माणसं गावात दिसायची. कुणाच्या घरात किती पाहुणे आलेत याच सुद्धा खूप कौतुक असायचं....!
भिवाई देवीची जत्रा धनगर समाजाची..हजारो लोक या निमीत्ताने चैत्र पोर्णीमेला गावात यायची. भाविकांच्या येण्या- जाण्याची सोय व्हावी म्हणून एस टी महामंडळ विशेष गाड्या सोडायंच...!
पण बहुतेक भावीक बैलगाड्यतूनच यायचं..आम्ही सगळी पोर त्यावेळी त्या बैलांच्या घुगरांच्या आवाजानं बेभान व्हायचो. यंदा किती जत्रा भरेल यासाठी गावात येणाऱ्या गाड्या आम्ही मोजायचो पण अंदाज बांधण अशक्य आसायचं.
पोर्णिमेचा चंद्र आभाळात खुपच मनमोहक दिसायचा. उकाड्यान हैराण झालेली लोक अंगणात आभाळ बघत झोपायची या जत्रेच्या दिवसात आम्हाला खळखळ चालणाऱ्या बैलगाड्या या चंद्रकोरात दिसायच्या...शितल चांदोमामा मनाला आनंद देऊन जायाचा..!
नदीच्या दुसऱ्या काठावर जत्रा भरायची पाल ठोकली जायाची. कुंकु हळदीची, बांगड्या, खेळण्याची, भेळ हाँटेल अशी अनेक दुकान लागायची. पाळण्यात बसताना आणि लाकडी घोड्याची गोल गोल फिरणारी खेळ जत्रेला रुप द्यायचे. सांरख नदीकडं येऊन किती पाल, दुकानं आल्यात ती आम्ही मोजून जायाचो.
जत्रेच्या दिवशी गावात मारुती मंदीरात मारुती जन्माची भजन सुरु होत असे आणि नदीकाठावर भावीकांच्या उत्साहाला उधान आलेले असायचे. सगळं गाव पै पाहुण्यांनी आणि जत्रकरुंनी भरलेले असायचं.
नदीच्या वाळवंटात जत्रेकरुंची पाल पडलेली असायची. देवीला कापलेल्या बकर्याच मटन मोठ्या मोठ्या पातेल्यात शिजायचं...सगळा वास गावभर पसरलेला असायचा...!
बंधार्यावरुन मुंगी शिरायलाही जागा नसायची. गावातली तरणी पोरं सारी जत्रा न्याहाळत फिरायची. कलिंगडाची लाल फोड आणि लाल पिवळ गारेगार लहान पोर आवडीनं खायाची.
भिवाई देवीच्या डोहात नवसाची बकरी पडायची...लाकडाच्या परड्या चालायच्या..ढोल..पिपाण्या..झांज ...रात्रभर वाजत असायच्या. भिवाईच्या नावान चांगभल.....धूळोबाच्या नावान चांगभल च्या आरोळ्या आसमंतात भिडायच्या..... धनगरी गीतांनी फेर धरलेला असायचा आणि जत्रा शिगेला पोहचलेली असायची.
माहेरवाशीणी आपल्या पोरांना भिवाईच्या पायावर घालायच्या...सुखाचं ठेव म्हणत आशिर्वाद घ्यायच्या.
जत्रेचा दिवस जसा जसा कलायचा तसा उत्साह शिगेला पोहचायचा..अर्ध्या रात्री मग जत्रा फुटायची. घुगरांच्या गाड्या जश्या खळ खळ वाजत यायच्या तश्याच खळखळत निघायच्या देखील... दोन दिवसांनी गावातली जत्रेच्या निमीत्ताने आलेली पै पाहुणेही निघायची यावेळी मन मात्र भरुन यायचं...भरलेले गाव रीत होत जायांच ....मागल्या काही दिवसापासून ऐन उन्हाळ्यात आलेला हा प्रसन्न वसंत असा निघून जाताना हुरहुर लावायचा....!
आजही गावात भिवाईची जत्रा भरते पण आमच्या लहानपणीची ही जत्रा अजूनही मनाचा कोपरा हळवा करते. गावाची, मातीची नात्याची ओढ लावते.
- बिपीन जगताप
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.