शितलचे मारेकरी ..!
मराठवाड्यात नापीकी आहे....कारण शेती पिकत नाही. पाणी मिळत नाही....पण तरीही हुंड्याचा मात्र सुकाळ आहे.
गरीब माणूस एकमेकांची दुख: जाणतो आणि म्हणूनच तो संवेदनशिल असतो पण असे होत नाही,..... मुलाला हुंडा असा घेतो कि चारचौघात सांगताना प्रतिष्ठा कमी होणार नाही याची काळजी घेतो.
अठराविश्व दारिद्र असणाऱ्या घरात शेतकऱ्याला मुलीची काळजी वाटते. वयात आलेली मुलगी बघीतली तरीही त्याच्या काळजात धस्स होते. लग्न कसे करायचे या एकाच प्रश्नांने त्याची झोप मोडते. वाढत्या वयाची लेक घरातील सगळ्यांचीच काळजी असते.
सावकाराचं कर्ज काढायचं लेकीचं लग्न लावायचं आणि आयुष्यभर ते कर्ज फेडण्यात घालवायचं या दुष्ट चक्रात मुलीचा बाप सापडतो. म्हणूनच मग मुलगीच नको या निर्णयापर्यंत येऊन पोहचतो. .....यातूनच मग मुलगी मरते आणि स्त्रीभ्रुण हत्या जन्माला येते.
मराडवाड्यातील तरुणांनी आता ठरवल पाहीजे हुंडा घेणार नाही..जातीची खोटी प्रतिष्ठा जपणार नाही. कष्ट करुन पैसा कमवेन. पण कोणाच्याही मुलीचा जीव घेणार नाही.
मराठवाड्यातील लातूर येथील शितल वायाळ या आपल्या बहिणीने आपल्या डोळ्यात अंजन घातले आहे. शितलने लिहलेले पत्र काळजाचा ठाव घेते. आपल्या समाजात असलेल्या वाईट चालीरीती , अनिष्ठ प्रथा, आणि खोटी प्रतिष्ठेचा शितलने बुरखा फाडला आहे. सर्व जातीच्या लोकांसाठीच ही चपराक आहे.
हुंड्याला प्रतिष्ठेचा मुद्दा करत मुलाला दहा लाख हुंडा आणि पंन्नास तोळे सोने मागणार्या निर्लज्य लोकांनी शितलची हत्या केली आहे.
पाणी नसणाऱ्या कोरड्या विहीरीत शितलने आत्महत्या केली नाही तर इथल्या पुढारलेल्या, प्रतिष्ठित असणाऱ्या आपण सर्वांनी तीचा जीव घेतला आहे. तीला विहीरीत उडी मारायला प्रवृत्त केले आहे.
आपण एवढे गेंड्याच्या कातडीचे झाले आहोत का ? आपल्या समोर एक तरुणी संपून जाते याचं आपल्याला काहीच वाटत नाही.
फेसबूक आणि वाँटसअँप च्या आभासी जगात आपली माणूसकी आणि संवेदनशिलता संपली आहे का ? फक्त RIP लिहणे सोपे असते पण इथला शेतकरी त्यांच्या मुली माणसं आपला जीव देत आहेत हे चांगल्या निकोप समाजासाठी चांगले नाही. त्यामुळे फक्त आभासी जगात राहणाऱ्या लोकांनी संवेदनशिलपणे यावर विचार करणे आवश्यक आहे.
गेल्या वर्षी 'बस'चा पास काढायला पैसे नाहीत म्हणून सोनाली नावाच्या मुलीने आत्महत्या केली. लग्न जमलय पण हुंड्यासाठी पैसे नाहीत म्हणून अजून एका मुलीने जीव दिला. हे अत्यंत वेदनादायक आहे.
'पहिली बेटी धनाची पेटी' मुलीच्या जन्माच स्वागंत करा असे सांगणाऱ्या जाहीराती रोज पाहतो पण जो पर्यंत हुंडा द्यावा लागतो तो पर्यंत बेटी धनाची पेटी कशी होऊ शकेल.
अजून किती लेकीबांळीचे जीव आपण घेणार आहोत.
शितल तू आत्महत्या नाही केलीस तूझे बलिदान आहे. समाजातील अनिष्ठ प्रथा आणि खोट्या प्रतिष्ठेच्या विरोधातील....! आम्ही कणखरपणे उभे राहू...आम्ही हुंडा घेणार नाही ...आम्ही हुंडा देणार नाही...!
- बिपीन जगताप