तेच चेहरे देखणे जे प्रांजळाचें आरसे
गोमटे का सावळे मोल नाही फारसे ..!!
तीच पाऊले देखणी जी ध्यासपंथे चालती
वाळवंटातुन स्वास्त पदम रेखती ..!!
असा सुंदर चेहरा आणि देखणी पाऊले असणाऱ्या "सुहाना" या जागतिक ब्रॅंड चे सर्वेसर्वा विशाल चोरडीया सर यांच्याविषयी .....
नावाप्रमाणे विशाल ह्रदय, अमर्याद ऊर्जेचे स्रोत असलेले प्रेमाने ओथंबलेले व्यक्तिमत्व म्हणजे विशाल चोरडीया सर .....
सरांचा आणि माझा परिचय जवळपास सात आठ वर्षांपूर्वीचा महाबळेश्वर येथे असताना 'मधुबन' या ब्रँड च्या मार्गदर्शनासाठी तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश देवकर साहेब यांच्या समवेत मी सरांना भेटायला गेलो होतो.
सर अतिशय जिव्हाळ्याने बोलत होते. आम्हाला या ब्रँड साठी अतिशय सुंदर मागदर्शन करत होते. पहिल्याच भेटीत आपला वाटावा असा हा माणूस कायमचा आपला होऊन जातो ..!
विशाल सर म्हणजे उत्साहाचा अखंड कोसळणारा धबधबा, सकारात्मक ऊर्जेचा स्त्रोत, प्रेमाने बोलणारा आणि आपल्या लाघवी स्मित हास्याने ह्रदय जिंकणारा माणूस, उद्योजक म्हणून ते सर्वश्रेष्ट आहेतच पण माणूस म्हणून ते त्याहीपेक्षा एक पाऊल पुढे आहेत. मी आयुष्यात अनेक लोकांना भेटलो पण आध्यात्मिक आणि प्रेमळ माणसाला भेटण्याची प्रचिती मला विशाल चोरडिया सरांना भेटून आली.
विशेष म्हणजे त्यांनतर काही वर्षांनी विशाल सर खादी ग्रामोद्योग मंडळाला सभापती म्हणून आले. मला व्यक्तिशः खूप आनंद झाला. जी व्यक्ती आपल्या उद्योगाच्या माध्यामातून हजारो लोकांना रोजगार निर्माण करून देत आहे अशा व्यक्तीच्या नेतृत्वाखाली ग्रामीण महाराष्ट्राचा विकास व्हावा या उद्धेशाने शासनाने दिलेली ही संधी त्यांनी कमी कालावधीत सार्थ ठरवली.
हजारो लोकांना दिशा देणारे आणि दूरदृष्टी असणारे विशाल सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला काम करण्याचे भाग्य मिळाले हा आनंद आम्हाला कायमच आहे.
खादी'ला आलेल्या पहिल्या दिवसापासून सरांनी मेहनत घेतली. महाखादी ब्रॅण्ड, मधमाशा पालनाची योजना, कोल्हापुरी चप्पल, शासनाच्या विविध योजना लोकांपर्यत जाण्यासाठी त्यांनी घेतलेले कष्ट अवर्णनीय असेच आहेत.
आपला करोडोचा उद्योग बाजूला ठेऊन ग्रामीण महाराष्ट्रातील अडीअडचणी जाणून घेण्यासाठी सरांनी संपूर्ण महाराष्ट्र पाहिला. कोकणातील सिंधुदुर्ग ते विदर्भातील चंद्रपूर गडचिरोली सगळा ग्रामीण महाराष्ट्र त्यांनी पिंजून काढला. गरीब उद्योजकांच्या घरी जाऊन त्यांच्या समवेत बसून त्यांच्या उद्योगातील अडीअडचणी जाणून घेतल्या.
राज्यात स्वातंत्र्यांनंतर पहिल्यांदा खादी'ची चळवळ अशा प्रकारे जोर धरत होती. महात्मा गांधींना अभिप्रेत असणारा ग्रामीण महाराष्ट्र निर्माण करण्याची प्रक्रिया विशाल सरांनी सुरु केली होती. महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांच्या आश्रमात पहाटेची प्रार्थना ते सूतकताई त्यांनी केली. घरी गांधींचा चरखा आणून सूतकताई केली. मुंबई राजभवन ते नागपूर राजभवन अशी महाखादी यात्रा सरांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आली. संपूर्ण राज्यात ग्रामीण योजना सांगितल्या गेल्या...उद्योजकांचा सन्मान केला गेला. त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली गेली. नव उद्योजकांना प्रोत्साहन देण्यात आले. हे सगळे करताना लोकांना आपलेसे करीत त्यांना मदत आणि आश्वासक पाठबळ त्यांनी दिले. खादी च्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करून त्यांच्यात देखील उत्साह आणला.
एक उमदे नेतृत्व मिळाले तर शासनाचा सामान्य लोकांना कसा फायदा होऊ शकतो हे विशाल सरांनी त्यांच्या तीन वर्षाच्या कालावधीत दाखवून दिले आहे.
एक प्रेमळ आणि समंजस माणूस, एक मोठा उद्योगपती असूनही समाजाविषयी संवेदनशील असलेले नेतृत्व....! सर्वांना आपल्यामध्ये सामावून घेत विशाल ह्रदय असणारे हे व्यक्तिमत्व लोभस आणि प्रेमाने ओथंबलेले असेच आहे.
आदरणीय सर,
गुरु चरणी लीन होताना आपण नेहमीच प्रेरणादायी दिसता....! आपल्या प्रत्येक शब्दांनी आम्हाला दहा हत्तीचे बळ मिळते..!
आपल्या सहवासाने जगण्याचे मर्म कळते..!आपण कायम आम्हाला असेच प्रेरित करीत रहाल ..!
- बिपीन जगताप