![]() |
वाट चुकणार नाही जीवनभर तुझी
एक तू मित्र कर आरशासारखा...!
मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा .....!!
आपल्या जीवनातील खरा मित्र तोच असतो ज्यामध्ये आपण रममान होतो...जो आपल्या आयुष्याला घडवतो वेळोवेळी मार्गदर्शन करतो आणि सतत प्रेरणा देतो असे मित्र आयुष्यात असणे भाग्यवान असतात.
प्रत्येकाला असे मित्र मिळणे दुर्मिळच.. पण पुस्तकासारखा मित्र मिळणे सहज शक्य आहे.
आज जागतिक पुस्तक दिन आहे. मोबाईलच्या वाढत्या वापरामुळे अनेकांचे वाचन कमी झाले आहे.
पुस्तकांपासून आपण दुरावलो आहोत. घराघरात असणारे वाचक कमी होणे म्हणजे समाजाचे शहाणपण कमी होणे. पुस्तक वाचण्यामुळे माणूस शहाणा होतो त्याला समजदार करण्याचे काम पुस्तक करते म्हणूनच आजचा पुस्तक दिन साजरा करायचा असेल तर पुस्तक वाचायला सुरुवात करणे गरजेचे आहे.
वाई येथील पसरणी घाटाकडे जाताना जय अंबिका हॉटेल आहे. निसर्गप्रेमी प्रशांत डोंगरे यांच्या या हॉटेलमध्ये सगळीकडे पुस्तके आहेत प्रत्येक टेबलावर माणसांना पाण्याच्या ग्लास सोबत पुस्तके ठेवली आहेत. पुस्तक प्रेमी असलेले प्रशांत या तरुणाची कल्पना मला खूप आवडली. स्वामी विवेकांनदांची वचने आणि स्वच्छ सुंदर निसर्गासोबत पुस्तके हि संकल्पना अत्यंत नावीन्यपूर्ण आहे.
अनेक विद्यार्थी वाचकप्रेमी या हॉटेल मध्ये येऊन तासनतास वाचू शकतात त्यांना कोणीही डिस्टर्ब करीत नाही हे विशेष ..!!
आजच्या वाचन कमी झालेल्या पिढीला जय अंबिका हॉटेल म्हणजे वाचन संस्कृती पुन्हा नव्याने सुरुवात करण्यासाठी ची पायाभरणी आहे.
प्रशांत डोंगरे या या तरुणांची हि आवड अनेकांना प्रेरणा देणारी आहे. वाईतील गरीब मुलांना शिकता यावे स्पर्धा परीक्षेसाठी लागणारी महागडी पुस्तके अभ्यासासाठी उपलब्ध व्हावीत या अनुषंगाने जवळपास पाच हजार पुस्तके या हॉटेल मध्ये उपलब्ध आहेत.
महाबळेश्वरच्या जवळ असणारे राज्यातील पहिले पुस्तकांचे गाव असणारे भिलार आपल्या सगळ्यांना माहित आहे पण शिक्षणाची आणि वाचनाची आवड असणारे वाई येथील प्रशांत डोंगरे यांचे हे पुस्तकालय आपणास प्रेरणा आणि वाचनाची आवड निर्माण करणारे आहे.
पुस्तक दिनाच्या निमित्ताने प्रशांत डोंगरे यांचे हे कार्य अनुकरणीय आहे.
आपण देखील या हॉटेल ला पुस्तकालयाला नक्की भेट द्या ..!!
पुस्तक दिनाच्या आपणस मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा ..!!
- बिपीन जगताप