देखणा देहांत ….! कर्मयोगी आप्पा
गोष्ट खूप जुनी आहे. एका बाईची आणि तिच्या एकुलत्या एका मुलाची…. मुलगा पोटात असताना बाप मरण पावला. एक मुल पदरात ठेऊन नवरा इहलोकीच्या यात्रेला निघून गेला. बाई जिद्धीची एका मुलाला घेऊन संसार उभा केला. आळंदीच्या ज्ञानेश्वरावर अपार श्रद्धा असणाऱ्या या बाईनी मुलाचे नावही ज्ञानदेव ठेवले.
पाठीराख्या भावांनी बाईला आधार दिला. मुलाने आईला जीव लावला. लहानपणापासूनच मुलाला भाऊ नाही बहिण नाही अशा कठीण परिस्थितीत दिवस जात होते. जगण्यासाठी कष्ट करणे क्रमप्राप्त होते. आईने मुलाला कष्टाची शिकवण दिली. कष्ट हाच मुलाचा मंत्र झाला.
माझे आजोबा ज्ञानदेव सीताराम जगताप यांचे नुकतेच कार्तिकी यात्रेला निधन झाले. कष्ट करणारे आणि कर्मातच ईश्वराला शोधणाऱ्या कर्मयोग्याचा कार्तिकीला शेवटचा दिस गोड झाला. तीन मुल तीन मुली आप्पांची संतती…त्यांची नातवंडे …. आणि नातूची मुले पाहण्याचा योग आप्प्पाना आला. जगात अनेक माणस जन्माला येतात मरण पावतात. आपले नाव मागे राहण्यासाठी खटाटोप करतात. आप्प्पानी प्रेमाची माणस कमावली. दुसर्याच्या शेतात काबाडकष्ट करत असताना आपल्या स्वतःची शेती घेतली. कष्टाने मिळवलेला प्रत्येक पै पै जमवली. अक्षरांचा गंध नसणारा माणूस अनुभवाने शहाणा होत गेला.
जगण्याची प्रत्येकाची एक पद्धत असते. आप्पांची पण एक पद्धत होती. सकाळी लवकर जेवण करावे…गाई घेऊन शेतात जावे …दिवसभर काळ्या आई ची सेवा करावी संध्याकाळी यावे जेवावे झोपावे. कोणाशी वाद विसंवाद नको. कधी कोणा पाहुण्याकडे गेले तर मुक्काम नको चुकून मुक्काम झाला तर पाहटे त्या गावातून निघून चालत आपल्या घरी पोहचणे. आपल्या उशिरा येण्याने दारात बांधलेली गाई उपाशी राहू नये हाच या मागच प्रामाणिक हेतू …. !
अध्यात्म भक्ति या शब्दांचा अर्थ कधीही समाजला नाही पण कार्तिकीची आळंदी ची वारी कधीही चुकवली नाही ऱस्त्यने जाणारा पांथस्थ त्यांना देवासारखा वाटायचा. दुसऱ्याच्या आत्म्याला दुखावणे म्हणजे पाप आणि दुसर्याचा सन्मान करणे म्हणजे पुण्या एवढीच व्याख्या त्यांनी जीवनभर अंगिकारली.
आप्पा हे नाव माझ्यासाठी नेहमीच वंदनीय आहे. कष्ट करत राबणाऱ्या हाताला आप्पांनी कर्मयोग शिकवला …मुक्या जनावरानाची ची सेवा करत भूतदया शिकवली …भुकेल्या माणसाची भूक भागवलि….आनंदी जीवन माणसाला मिळते पण ते जगण्याची कला आप्पांनी शिकवली. महिलांचा आदर केला.
ईश्वर जगात आहे का नाही हे माहित नाही पण कष्टावर प्रेम केले कि ईश्वर फळ देतोच हा विश्वास जागवला.
समाजात आपले नाव कमवावे …चांगल्या गुणांचा नेहमीच आदर केला जातो याची शिकवण आप्प्पानी मला नेहमीच दिली.
शेवटच्या दिवसात आप्पांची सेवा मनोभावे करणाऱ्या माझ्या आत्याचे खूप मोठे योगदान आहे. लेक किती सेवा करते याचे उत्तम उदाहरण म्हणजे आक्का …. आषाढी एकादशीला आप्पा धरणीला पडले. आणि जवळपास तीन महिने आक्कांनी त्यांची सेवा केली. आयुष्यात कधीही उपास तपास न करणाऱ्या या माणसाला शेवटच्या दिवसात खूप उपास घडले . संपूर्ण गाव आप्पांना कष्टकरी म्हणून ओळखायचे. शेती करताना मनापासून करायची … कोणतेही काम व्यवस्थित केले कि एक आनंद मिळतो तो मिळवण्याचा कायमच प्रयत्न हा माणूस करायचा .
आषाढी ते कार्तिकी हि वारकर्यांची वारी आप्प्पानी ज्ञानेश्वराशी एकरूप होऊन पूर्ण केली, एकादशीला हा देह सोडून जाईन हे नेहमीच आप्पा सांगायचे पण कार्तिकीला त्यांनी ते खरे करून दाखवले. दि. २२-११- २०१५ रोजी सांयकाळी ७. ३० वाजता अखेरचा श्वास त्यांनी घेतला.
जीवन आणि मरण यातील संघर्ष मी जवळून पहिला. दररोज यमराजाला परत पाठीवणे केवळ अश्यक्य मात्र एकादशीलाच देह सोडायचा निश्चय असल्याने त्या बाबतीत देखील आप्पाच जिंकले.
आप्पांनी आयुष्याची सुरुवात एकट्याने केली होती आणि शेवटी जातानाही हा माणूस एकटाच निघून गेला. नाती गोती जिवाभावाची लोक आजूबाजूला जोडली होती. अनेकांना जगण्याची रीत शिकवून आप्पांनी जगाचा निरोप घेतला पण त्यांच्या स्मृती पुढली अनेक वर्ष टिकून राहतील.
त्यांनी सांगितल्यानुसार त्यांच्या अस्थि विसर्जन पंढरपूरला चंद्रभागेत केले त्यांच्या सर्व मुलांनी मनोभावे सर्व विधी पूर्ण केला. चंद्रभागेच्या वाळवंटात कीर्तनातील निरोपाचा अभंग सुरु होता. सावळ्या विठ्ठलाला भेटायला कर्मयोगी ज्ञानेश्वर गेला होता. विठ्ठलाच्या ओठांवर देखील म्हणूनच स्मित दिसत होते. पंढरपुरात कार्तिकीचा सोहळा रंगा त आला होता आणि इकडे ज्ञानदेवाचा शेवटचा दिस गोड झाला होता.
देखणे मरण यायला …चांगल्या कर्माची सोबत असावी लागते …आज तो देखणा देहांत पाहायला मिळणे हे देखील माझे भाग्याच होते.
- बिपीन जगताप
९४०४१४०९८०
अप्रतीम लेख आहे वाचतांना मन भरून आले अश्या संतांच्या सानिध्यात रहायला मिळणे फार मोठे भाग्य लागते
उत्तर द्याहटवाKhup abhar aaple
उत्तर द्याहटवाSir apratim lekh
उत्तर द्याहटवा